पणजी : शिरदोन येथील एका घरातून सुमारे १२ लाख रुपयांचा रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरण्यात आली होती. या घरफोडीप्रकरणी आगशी व जुने गोवे पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत एका संशयिताला ताब्यात घेतले तर १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
वरीलप्रकरणी जुआव पिरीस यांनी आगशी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. त्यात २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० ते ३० सप्टेंबर रोजी रात्री ८.३० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने घराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करून खोलीतील बॅग लंपास केली. या बॅगेत सुमारे १ लाख रुपयांचे भारतीय चलन, ५,९०० अमेरिकन डॉलर आणि ३, ५०० पौंड लंपास केल्याचे नमूद केले होते.
तसेच मूळ पोर्तुगीज पासपोर्ट, सिटीझन कार्ड आणि ओसीआय कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला गेली होती. चोरीच्या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे १२ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
याप्रकरणाच्या तपासासाठी आगशी व जुने गोवे पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक तयार केले. पथकाने शिरदोन, आगशी आणि गोवा वेल्हा परिसरात तपास करून संशयिताला ताब्यात घेतले तर चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जकी हुसेन, शुभम कोरगावकर, रक्षा नाईक या उपनिरीक्षकांनी तसेच पोलीस कर्मचारी पुरेश अडकोणकर, किशन नाईक आणि निलेश साखळकर यांनी या प्रकरणाचा छडा लावला.


