सरकारी नोकरीपेक्षाही शेती देऊ शकते दुप्पट उत्पन्न!

पालयेतील रवळू परब यांनी स्वप्न उतरविले सत्यात : भेंडीसोबत झेंडूची आंतरपीक लागवड

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
25 mins ago
सरकारी नोकरीपेक्षाही शेती देऊ शकते दुप्पट उत्पन्न!

निवृत्ती शिरोडकर
पेडणे : सरकारी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी वडिलोपार्जित शेतजमीन पुन्हा लागवडीखाली आणून आधुनिक पद्धतीने शेती केली, तसेच कृषी व फलोत्पादन विभागाच्या योजनांचा योग्य लाभ घेतला, तर शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते. ‘शेती विकू नका, ती जपा आणि कसून स्वतःच्या पायावर उभे राहा,’ असा संदेश पालये येथील युवा शेतकरी रवळू परब यांनी दिला.‍‍
रवळू परब आणि त्यांच्या बंधूंनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित जमिनीलाच रोजगाराचे साधन बनवले आहे. फुलशेती आणि भाजीपाला उत्पादनात विविध प्रयोग करताना सध्या त्यांच्या शेतात भेंडी आणि झेंडूची आंतरपीक पद्धतीने लागवड करण्यात आली आहे.
एक पीक संपताना दुसऱ्यातून उत्पन्न
भेंडीचा हंगाम संपत असतानाच झेंडूचा मळा फुलांनी बहरला आहे. त्यामुळे एक पीक संपत असताना दुसऱ्या पिकातून उत्पन्न सुरू राहते. झेंडूचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा भेंडीची लागवड करण्याबरोबरच मोकळ्या जागेत कलिंगड घेण्याचे नियोजन परब बंधूंनी केले आहे.
‘आठ तास शेतीला दिल्यास भरघोस उत्पन्न’
सरकारी कर्मचारी नोकरीसाठी दररोज आठ तास देतो. त्याचप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने स्वतःच्या शेतात आठ तास मेहनत घेतल्यास शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्याची क्षमता असल्याचे परब यांनी सांगितले. परब बंधू स्वतः शेतात राबत असून, त्यांच्या शेतीमुळे सात ते आठ मजुरांनाही नियमित काम मिळत आहे. त्यामुळे ही शेती केवळ त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन न राहता इतरांसाठीही रोजगारनिर्मिती करणारी ठरत आहे.
रानटी जनावरांचे आव्हान कायम
शेती करताना रानटी जनावरांमुळे पिकांचे नुकसान होते. मात्र या अडचणींमुळे शेती सोडण्याऐवजी त्यावर मात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे परब यांनी सांगितले. विविध सरकारी योजनांचा लाभ घेत शेती व्यवसायातून स्वावलंबी होता आल्याचेही त्यांनी नमूद केले.
भेंडीला बाजारपेठेचा आधार
भेंडीच्या विक्रीसाठी फलोत्पादन क्षेत्रातील सरकारी यंत्रणेचा आधार मिळत असून मालाला योग्य मोबदला मिळत असल्याचे परब यांनी सांगितले. झेंडूच्या फुलांनाही स्थानिक बाजारपेठेत तसेच थेट शेतातून मागणी मिळत आहे. त्यामुळे युवकांनी बाजारपेठेअभावी शेतीपासून दूर न जाता उपलब्ध संधींचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पडीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणा
पडीक वडिलोपार्जित जमीन लागवडीखाली आणा, सरकारी योजनांची माहिती घ्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आणि शेतीला व्यवसायाचे स्वरूप द्या, असे परब यांनी युवकांना आवाहन केले. भेंडी, झेंडू आणि आगामी काळात कलिंगड अशा नियोजनबद्ध पीकपद्धतीतून वर्षभर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आजपर्यंत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कुठे अर्ज किंवा शिफारशीच्या मागे धावलो नाही. आमच्याकडे असलेल्या जमिनीचा उपयोग करून त्यातून रोजगार निर्माण करण्यावर आम्ही भर दिला.
- रवळू परब, युवा शेतकरी, पालये

हेही वाचा
सर्व पहा