पद नव्हे, जनसेवा हेच ध्येय : श्रीपाद नाईक

सांपेद्र येथे वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
04th October, 11:26 pm
पद नव्हे, जनसेवा हेच ध्येय : श्रीपाद नाईक

पणजी : राजकारणात पद मिळवणे हे माझे कधीच ध्येय नव्हते. जनसेवा हेच माझे ध्येय होते आणि आजही आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. सांपेद्र येथे आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दिगंबर कामत, भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, सिद्धेश नाईक यांच्यासह इतर मंत्री व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण गोव्यातील जनतेने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

माझ्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे कार्यकर्ते आणि समस्त गोमंतकीयांचा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीमुळे जनतेसाठी काहीतरी काम करण्याची प्रेरणा मिळाली. पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर केंद्रात मंत्री होण्याची संधी मला मिळाली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यामागे गोमंतकीयांचे आशीर्वाद आहेत, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

आयुर्वेद संस्था उभारणीत भाऊंचे मोठे योगदान : मुख्यमंत्री

धारगळ येथील आयुर्वेदिक केंद्र तसेच रायबंदर येथील आयुष हॉस्पिटल उभारण्यात श्रीपाद नाईक यांचे मोठे योगदान आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले श्रीपाद नाईक हे आमच्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांना ‘भाऊ’ म्हणतो. खासदार म्हणून त्यांनी प्रत्येक पंचायत आणि मतदारसंघासाठी बालरथ, रुग्णवाहिका, सभागृह आदींसाठी निधी उपलब्ध करून दिला. खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा