पावसासाठी बेडूक पूजा; हिट्टीनबैल ग्रामस्थांची अनोखी परंपरा

दुष्काळाच्या संकटात १० गावांची एकजूट; दिवसभर उपवास करत काढली बेडूक दिंडी

Story: गोवन वार्ता। वार्ताहर |
just now
पावसासाठी बेडूक पूजा; हिट्टीनबैल ग्रामस्थांची अनोखी परंपरा

कारवार : कारवार जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात पावसाचे आगमन लांबल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याचे स्रोत आटत आहेत. पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत असतानाच कन्निगेरी ग्रामपंचायत हद्दीतील हिट्टीनबैल आणि परिसरातील सुमारे १० गावांतील ग्रामस्थांनी पावसासाठी पारंपरिक ‘बेडूक दिंडी-देंडळी सुगी’ विधी केला. या माध्यमातून ग्रामस्थांनी वरुणदेवाकडे पावसासाठी प्रार्थना केली.
ग्रामस्थांनी पावसासाठी सामूहिक संकल्प केल्यानंतर बेडकाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर वाद्यांच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे दिंडीत सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास केला. अनवाणी चालत ग्रामस्थांनी परिसरातील गावांमध्ये दिंडी नेली.
हिट्टीनबैलसह गोपिगाळी, सातनकोप्प, चिक्कमावळी, दुर्गाडी, मावळी यांसह परिसरातील सुमारे १० गावांमध्ये ही दिंडी फिरविण्यात आली. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून श्रद्धेने बेडकाची पूजा केली.


बेडकांचे तलावात केले विसर्जन
दिवसभर गावोगावी फिरल्यानंतर सायंकाळी पुन्हा बेडकाची पूजा करण्यात आली. त्यानंतर बेडकाला तलावात विसर्जित करण्यात आले. बेडूक पाण्यात सुखरूप आणि शांतपणे राहिल्यास वरुणदेव प्रसन्न होऊन पाऊस पाडतो, अशी या भागातील ज्येष्ठांची पारंपरिक श्रद्धा आहे.
त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून सुटका व्हावी, वेळेवर चांगला पाऊस पडावा आणि शेतीला पाणी मिळून पिके जोमाने वाढावीत, यासाठी ग्रामस्थांनी या अनोख्या परंपरेतून वरुणदेवाकडे प्रार्थना केली.
पाऊस‍, शेतीसाठी सामूहिक प्रार्थना
दुष्काळाच्या संकटातून सुटका व्हावी, वेळेवर चांगला पाऊस पडावा आणि शेतीला पुरेसे पाणी मिळून पिके जोमाने वाढावीत, यासाठी ग्रामस्थांनी या परंपरेतून वरुणदेवाकडे प्रार्थना केली. आधुनिक काळातही पाऊस, शेती आणि निसर्गाशी जोडलेली ही लोकपरंपरा ग्रामस्थांनी जपली आहे. संकटाच्या काळात सुमारे १० गावांनी एकत्र येत केलेली ही सामूहिक प्रार्थना आणि बेडूक दिंडी परिसरात चर्चेचा विषय ठरली.

हेही वाचा
सर्व पहा