साल्वादोर द मुंद-चोडण येथील प्रस्तावित पूलाला केंद्राचा हिरवा कंदील

साल्वादोर द मुंद आणि चोडण बेटाला जोडणाऱ्या ३६३ कोटींच्या पुलाला तज्ज्ञ मूल्यांकन समितीने सीआरझेड मंजुरीची शिफारस केली आहे. सुधारित आराखड्यामुळे मॅन्ग्रोव्ह झाडांवरील परिणाम कमी होणार असून ३,१०५ झाडांची पुनर्लागवड केली जाईल.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
साल्वादोर द मुंद-चोडण येथील प्रस्तावित पूलाला केंद्राचा हिरवा कंदील

पणजी : बार्देझ तालुक्यातील साल्वादोर-द-मुंद आणि तिसवाडी तालुक्यातील चोडण बेटावरील माडेल या भागांना जोडणाऱ्या ३६३ कोटी रुपयांच्या प्रस्तावित पुलाला अखेर केंद्राचा हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्र सरकारच्या किनारपट्टी नियमन क्षेत्राबाबतच्या (सीआरझेड) तज्ज्ञ मूल्यांकन समितीने या पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली आहे. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) पुलाच्या खांबांच्या मूळ आराखड्यात योग्य ते सुधारित बदल करून पर्यावरणावरील प्रभाव कमी केल्याने ही शिफारस करण्यात आली आहे.

या पुलाच्या मूळ प्रस्तावानुसार सुमारे ६२१ खारफूटी झाडांवर परिणाम होणार होता. परंतु पर्यावरणीय आक्षेप आणि सूचनांनंतर प्रशासनाने साल्वादोर-द-मुंदच्या बाजूकडील खांबांची संख्या १२ वरून ९ पर्यंत कमी केली आहे. यामुळे सुमारे १०० हून अधिक खारफूटीच्या झाडांचे नुकसान टळले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बाधित झाडांच्या बदल्यात १:५ या प्रमाणात एकूण ३,१०५ नव्या खारफूटीच्या झाडांची पुनर्लागवड करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या संपूर्ण लागवडीचे जिओ-टॅगिंग करून त्यावर नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देश समितीने दिले आहेत. तसेच या प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांच्या पर्यावरण व्यवस्थापन आराखड्याची तरतूद करण्यात आली आहे.

सध्या साल्वादोर-द-मुंद आणि चोडण बेटादरम्यान जलवाहतुकीसाठी फेरी सेवा हाच एकमेव थेट पर्याय उपलब्ध आहे. या प्रस्तावित पुलामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी कायमस्वरूपी, सुरक्षित आणि जलद रस्ते संपर्क उपलब्ध होणार आहे. यामुळे दोन्ही तालुक्यांमधील प्रवास अधिक सुलभ होणार असून स्थानिक आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा