"माझा मृत्यू झाला तर..."; नाना पाटेकर यांचे जुने भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे जीवन-मृत्यूच्या वास्तववादी तत्त्वज्ञानावर आधारित एक जुने भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, आज त्यांच्या निधनानंतर हे भाषण पुन्हा प्रकाशात आले आहे. नेटीझन्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
08th October, 11:24 am
"माझा मृत्यू झाला तर..."; नाना पाटेकर यांचे जुने भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पणजी : भारतीय सिनेसृष्टीतील आपल्या सशक्त, रोखठोक आणि अद्वितीय अभिनयाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने गोव्यात निधन झाले. गोव्यातील राहत्या घरी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पहाटे ५:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पडद्यावर आपल्या संवादांनी आणि जिवंत अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या महान कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि देश-विदेशातील चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Nana Patekar: A Legacy of Voice, Fury, and Vulnerability (1951–2026)


निधनाच्या दोन दिवसांपूर्वीच गोव्यातील सांस्कृतिक व्यासपीठावर गजबजले होते नानांचे रूप

विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच नाना पाटेकर पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या सम्राट क्लब इंटरनेशनलच्या राज्यस्तरीय अधिकारग्रहण सोहळ्यात हिरिरीने सहभागी झाले होते. गोव्याच्या समृद्ध आणि नयनरम्य सांस्कृतिक वारशाचे मनापासून कौतुक करत त्यांनी पारंपरिक दिवली नृत्य करणाऱ्या कलाकारांसोबत मंचावर ठेका धरला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी उत्साहाने गोव्याचे पारंपरिक 'सामेळ' हे वाद्यही वाजवून उपस्थितांची दाद मिळवली होती. या सोहळ्यात आपल्या अभिनय प्रवासाच्या आठवणी उलगडताना त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला होता. तोच उत्साह आणि तीच ऊर्जा अनुभवणाऱ्या उपस्थितांना अवघ्या दोन दिवसांत असा दुःखद धक्का बसेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.



"माझा मृत्यू झाला तर..."; जीवन-मृत्यूचे वास्तव मांडणारा जुना व्हीडिओ तुफान व्हायरल

नानांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर शोककळा पसरली. याच दरम्यान त्यांचे जीवन आणि मृत्यूच्या वास्तववादी तत्त्वज्ञानावर आधारित एक जुने विचारप्रवर्तक भाषण सोशल मीडियावर आणि युट्यूबवर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या कणखर अभिनयासोबतच समाजात विविध विषयांवर संवेदनशील आणि भावूक विचार मांडण्यासाठी नाना ओळखले जात असत. निधनानंतर पुन्हा प्रकाशात आलेल्या या व्हीडिओमध्ये त्यांनी "माझा मृत्यू झाला तर..." या विषयावर अत्यंत मार्मिक आणि काळजाला भिडणारे विधान केले होते, जे ऐकून आज प्रत्येक चाहत्याचे डोळे पाणावत आहेत.



जीवन, प्रसिद्धी आणि मृत्यूच्या कटू वास्तवाचे सुरेख दर्शन

त्या व्हायरल भाषणात नानांनी अत्यंत साध्या, सहज आणि सोप्या शब्दांत मानवी जीवन, प्रसिद्धी आणि मृत्यू यातील कटू सत्य मांडले होते. माणूस जिवंत असताना स्वतःला खूप महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण समजतो, मात्र त्याच्या जाण्याने जगातील कोणतीही गोष्ट किंवा कोणाचेही आयुष्य थांबत नाही, हे त्यांनी यात अधोरेखित केले होते. व्यक्तीच्या अनुपस्थितीनंतरही जग हे पूर्वीसारखेच चालत राहते आणि काळाच्या ओघात सर्व काही पुढे निघून जाते, असे विचार त्यांनी मांडले होते. आयुष्य जगताना अति-अहंकार बाळगण्याऐवजी अत्यंत साधेपणाने जगले पाहिजे आणि समाजासाठी कार्य केले पाहिजे, हाच महत्त्वपूर्ण संदेश त्यांच्या या भाषणातून मिळतो. आज त्यांच्या निधनानंतर हेच शब्द चाहत्यांच्या मनात घर करत आहेत.


Saddened by the passing away of veteran actor Thiru. Nana Patekar. His  powerful performances, distinctive presence and immense contribution to  Hindi and regional cinema will remain etched in our memories. My heartfelt


ज्यांनी ज्यांनी नटसम्राट साकारला त्यांच्या हार्ट अटॅकने मृत्यू झाला : नाना पाटेकर 

“एखादी भूमिका करताना त्यात सर्वोत्कृष्ट अभिनय करण्यासाठी पूर्ण जीव ओतावा लागतो. आतापर्यंत ज्या-ज्या अभिनेत्यांनी 'नटसम्राट' या नाटकात मुख्य भूमिका साकारली, त्या सर्वांचा दुर्दैवाने हार्ट अटॅकनेच मृत्यू झाला. या भूमिकेशी पूर्णपणे समरस होऊन जर मी हे नाटक केले असते, तर २५ प्रयोग झाल्यानंतर माझाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला असता. याच कारणामुळे मी नाटक न करता 'नटसम्राट' चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला,” असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केला होता.


Prime Video: Natsamrat


नागपूर येथील रेशीमबाग येथे 'पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे'च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'जलक्रांती परिषदे'त बोलताना नाना पाटेकर यांनी या आठवणींना उजाळा दिला होता. या वेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते, “विक्रम गोखले हे अत्यंत उत्कृष्ट आणि महान अभिनेते होते, त्यांची अभिनयाची उंची गाठणे मला कधीही शक्य नाही. 'नटसम्राट' या नाटकात डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले या सर्वांनीच अत्यंत अभूतपूर्व अभिनय केला. या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले आणि प्रत्येक प्रयोगात या दिग्गजांनी अगदी जीव ओतून काम केले.”


नटसम्राटां'ची जुगलबंदी - Marathi News | Article On Natsamrat Marathi Movie  - Latest Manoranjan News at Loksatta.com


पहाटे २:३० वाजता मित्राला मेसेज आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वीच्या गंभीर प्रसंगाबाबत मणिपाल रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी सविस्तर माहिती दिली. पहाटे सुमारे २:३० वाजता नानांनी तब्बेत बरी नसल्याचा मेसेज आपल्या एका मित्राला पाठवला होता. मात्र, रात्रीची वेळ असल्याने मित्राला तो मेसेज वेळेत पाहता आला नाही. पहाटे ४ वाजता मित्र त्यांच्या घरी पोहोचला असता नानांना प्रचंड घाम येत होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्या केअरटेकर रुग्णालयात जाऊन ॲम्ब्युलन्स घेऊन परत आला, परंतु तोपर्यंत नाना अचेतन झाले होते. घरीच सीपीआर देण्यास सुरुवात करण्यात आली आणि रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सलग ४५ मिनिटे ते एक तास कार्डियाक मसाज देऊन त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु पहाटे ५:३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.


Actor Nana Patekar dies at 75


"सुरुवातीला वाटली फेक न्यूज"; सयाजी शिंदे आणि पुतण्या प्रसाद पाटेकर गोव्यात दाखल

नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे पुतणे प्रसाद पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे हे तातडीने गोव्यात दाखल झाले. माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे अत्यंत भावूक झाले होते. सकाळी ७ वाजता नाना गेल्याची बातमी मिळाली, मात्र सुरुवातीला ही एखादी 'फेक न्यूज' असेल असे वाटले, पण इथे आल्यावर ही कटू सत्यता समजली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, निधनाचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) शवविच्छेदन करण्यात येत असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य सरकारकडून पाटेकर कुटुंबाला सर्व आवश्यक ते सहकार्य पुरवले जाईल, असे स्पष्ट केले आहे.



अंत्यसंस्कारासाठी पार्थिव विमानाने पुण्यात नेले जाणार

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर आणि पत्नी दुपारी गोव्यात पोहोचणार आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव सन्मानाने कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाईल. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या अंतिम विधीसाठी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने (एअरलिफ्ट करून) पुण्यात नेण्यात येणार आहे. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा महान कलाकार आता भौतिकदृष्ट्या आपल्यात नसला, तरी त्यांनी अभिनयाच्या आणि विचारांच्या माध्यमातून निर्माण केलेला वारसा कायम अजरामर राहील.


Natsamrat (2016) | MUBI

हेही वाचा
सर्व पहा