मडगावात १.८३ लाखांचे ४०८ किलो मांस जप्त

मडगाव रेल्वे स्थानकाजवळ एफडीएची धडक कारवाई

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
08th October, 11:40 pm
मडगावात १.८३ लाखांचे ४०८ किलो मांस जप्त

मडगाव : मडगाव रेल्वेस्थानक परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी पहाटे केलेल्या तपासणी मोहिमेत १ लाख ८३ हजार ६०० रुपये किमतीचे ४०८ किलो मांस जप्त केले. जप्त मांसावर आवश्यक लेबल, खरेदीची बिले, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र आणि वाहतूक परवाना नसल्याचे तपासणीत आढळून आले.

एफडीएच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी नवी दिल्लीहून सुटलेली रेल्वे ८ ऑक्टोबर रोजी मडगाव स्थानकावर पोहोचली. या रेल्वेतून आणलेले ५८ किलो मांस मडगावातील किरकोळ विक्रेत्यांना देण्यासाठी ओम्नी वाहनात भरले जात असताना एफडीएच्या पथकाने ते ताब्यात घेतले. या मांसाची किंमत सुमारे २६ हजार १०० रुपये होती.
जप्त मांसावर आवश्यक लेबल घोषणा नसल्याचे तसेच खरेदीची बिले उपलब्ध नसल्याचे आढळले. वाहतुकीसाठी आवश्यक पशुवैद्यकीय प्रमाणपत्र आणि वाहतूक परवानाही सादर करण्यात आला नाही. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांचे पालन न करता मांसाची साठवणूक व वाहतूक केल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे मांस अयोग्य असल्याने ते नष्ट करण्याचे लेखी हमीपत्र संबंधित अन्न व्यवसाय चालकाने दिले आहे.
तसेच, दुसऱ्या महिंद्रा कॅरिअर वाहनाची तपासणी केली असता पाच बॉक्समध्ये ३५० किलो मांस आढळले. त्याची किंमत सुमारे १ लाख ५७ हजार ५०० रुपये होती. दोन्ही वाहनांतून एकूण ४०८ किलो मांस जप्त करण्यात आले.
दक्षिण गोव्याच्या नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव व प्रिया, अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप तसेच कर्मचारी गौरीश आणि दुमीन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रेल्वेतून येणाऱ्या मांसावर नियमित तपासणी आवश्यक
‍कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर यापूर्वीही खाण्यास अयोग्य मांसाचा साठा जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातसह विविध राज्यांतून रेल्वेमार्गे मोठ्या प्रमाणात मांसाची वाहतूक केली जाते. प्रवासाचा कालावधी लक्षात घेता हे मांस खाण्यायोग्य राहते का, असा प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाला आहे. त्यामुळे एफडीएने रेल्वेतून होणाऱ्या मांस वाहतुकीवर नियमित तपासणी मोहीम सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा