अपहृत १६ वर्षीय मुलीचे प्रियकरापूर्वी वडिलांनीही केले होते लैंगिक शोषण

मुलीची मुंबईतून सुटका : प्रियकरासह वडिलांना कळंगुट पोलिसांकडून अटक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
06th October, 11:36 pm
अपहृत १६ वर्षीय मुलीचे प्रियकरापूर्वी वडिलांनीही केले होते लैंगिक शोषण

म्हापसा : स्वतःच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना अटक केली आहे. दरम्यान, मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी दिबेंदू मोंडल (३१, रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे. पीडित मुलीची पोलिसांनी मुंबईतून सुटका करून गोव्यात आणले होते.
सोमवारी, ५ रोजी मुंबईतून सुटका केल्यानंतर पीडितेची बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अहवालात लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी यापूर्वी नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वर्गीकरण केले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ व ८ अन्वये कारवाई करण्यात आली. दिबेंदूला मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली.
पीडित मुलगी २९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वा. शाळेतून बेपत्ता झाली होती. कळंगुट पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला. तपासादरम्यान ती पश्चिम बंगालमधील दिबेंदू मोंडल याच्या सतत संपर्कात असून त्याच्यासोबत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांचा माग काढत मुंबई गाठली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले. त्यावेळी दिबेंदूला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सकाळी चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

सांगोल्ड्यातील नोकरीदरम्यान ओळख
दिबेंदू मोंडल सांगोल्डा येथील एका गाळ्यावर हेल्पर म्हणून काम करत होता. याच काळात तो पीडितेच्या संपर्कात आला आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुढील तपास कळंगुट व साळगाव पोलीस करीत आहेत.    

वडिलांकडून वारंवार अत्याचाराचा आरोप
वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेने पीडित सहाय्य कक्षासमोर दिलेल्या जबाबात वडिलांकडूनही लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. ती १२ वर्षांची असल्यापासून वडील तिच्यावर वारंवार अत्याचार करत असल्याचा आरोप तिने केला. याबाबत कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिल्याचेही तिने जबाबात नमूद केले आहे. आईला या प्रकाराची माहिती असल्याचा दावाही तिने केला आहे. या जबाबाच्या आधारे साळगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६८ आणि पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ व ८ अन्वये गुन्हा नोंदवून वडिलांना अटक केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा