वाहतूक पोलिसांच्या ई-चलनाच्या नावाखाली एकाची ३.७८ लाखांची फसवणूक

अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
06th October, 11:34 pm
वाहतूक पोलिसांच्या ई-चलनाच्या नावाखाली एकाची ३.७८ लाखांची फसवणूक

पणजी : वाहतूक पोलिसांच्या ई-चलानाच्या नावाखाली बनावट एसएमएसद्वारे तिसवाडी तालुक्यातील एका नागरिकाची ३ लाख ७८ हजार ६७८ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसवाडी तालुक्यातील ४८ वर्षीय नागरिकाला २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०६ वाजता अज्ञात व्यक्तीने एसएमएस पाठवला. त्यांच्या वाहनावर दोन हजार रुपयांचा ई-चलान दंड आकारण्यात आल्याचे संदेशात नमूद करण्यात आले होते. दंडाची माहिती पाहण्यासाठी तसेच ऑनलाइन भरणा करण्यासाठी संदेशात एक लिंकही देण्यात आली होती. तक्रारदाराने लिंक उघडताच त्यांच्या बँक खात्यातून ३ लाख ७८ हजार ६७८ रुपये गायब झाले. खात्यातून मोठी रक्कम वळती झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुने गोवा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत पोखरे यांनी अज्ञात मोबाईलधारकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.