वाळपई : जवाहर नवोदय विद्यालय, वाळपई येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला कोणतेही स्पष्ट कारण किंवा योग्य माहिती न देता पहाटेच्या वेळी विद्यालयातून बाहेर पाठवून रस्त्याच्या कडेला सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यार्थिनीची आई वैभवी वीरसिंग देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी वाळपई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, विद्यालयाच्या प्राचार्यांनी पालकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित विद्यार्थिनींसह तीन विद्यार्थिनी मध्यरात्रीनंतर परवानगी न घेता वसतिगृहाबाहेर आल्याचे प्राचार्यांनी सांगितले. विद्यालयाच्या शिस्तीचे उल्लंघन झाल्यामुळे नियमानुसार कार्यवाही करण्यात आली असून, विद्यार्थिनींना घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही प्राचार्यांनी सांगितले.
पहाटे ४.३५ वाजता पालकांना दूरध्वनी
पालकांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वैभवी देसाई यांची मुलगी तन्वी ही जवाहर नवोदय विद्यालय, वाळपई येथे इयत्ता दहावी ‘ब’ मध्ये शिक्षण घेत आहे. ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३५ वाजता विद्यालयाकडून पालकांना दूरध्वनी करण्यात आला. मुलीला घेऊन जाण्यासाठी विद्यालयात येण्यास सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थिनीला विद्यालयातून का पाठविण्यात येत आहे, याबाबत पालकांना योग्य कारण किंवा समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. अचानक पहाटेच्या वेळी विद्यालयाकडून दूरध्वनी आल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली.
पालकांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर सुमारे ५.२८ वाजता विद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीला साखळी येथील गृहनिर्माण मंडळ परिसरात रस्त्याच्या कडेला आणून सोडले. विद्यार्थिनीला तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचविण्याऐवजी रस्त्याच्या कडेला सोडण्यात आल्याने पालकांनी या प्रकाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
चौकशी समिती गठीत
या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी विद्यालयाकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून घटनेशी संबंधित सर्व बाबींची तपासणी केली जाणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रती वाळपई पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी, केंद्रीय नवोदय विद्यालय समिती तसेच संबंधित पालकांना देण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.


