एफडीएची कळंगुट, सासष्टीत कारवाई; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ रेस्टॉरंट्सचे काम बंद

गोव्यात एफडीएकडून अन्न सुरक्षा तपासणी मोहीम राबवत अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ उपाहारगृहांचे कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
08th October, 02:45 pm
एफडीएची कळंगुट, सासष्टीत कारवाई; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ रेस्टॉरंट्सचे काम बंद

पणजी : गोव्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कळंगुट आणि सासष्टी परिसरात अन्न सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तपासणी मोहीम राबवून नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. कळंगुट येथील मोहिमेदरम्यान एकूण नऊ रेस्टोरंट्सची पाहणी करण्यात आली. यात मूलभूत स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवल्याचे निष्पन्न झाल्याने पाच उपाहारगृहांचे कामकाज तात्काळ स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कारवाई झालेल्यांमध्ये दोन नामांकित रेस्टोरंट चेन मधील क्यूएसआर (QSR) उपाहारगृहांचा समावेश आहे. तसेच आंतरराज्य बसस्थानकावर आढळलेली सुमारे २५ किलो फिल्टर कॉफी जप्त करण्यात आली. त्रुटींची दुरुस्ती होईपर्यंत ही उपाहारगृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे पालन न केल्यास दंडही आकारला जाणार आहे.

याच तपासणीदरम्यान अतिप्रमाणात कृत्रिम रंग वापरलेले ५० किलो शिजवलेले चिकनचे पदार्थ शोधून ते तातडीने नष्ट करण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी ही मोहीम सर्व भागांत सातत्याने राबवणार असून, सर्व अन्न व्यावसायिकांनी दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा त्यांचे परवाने निलंबित केले जातील, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. ही कारवाई संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, डार्लीन दीवकर आणि कर्मचारी संदीप शेळके यांच्या पथकाने केली.

दुसऱ्या एका कारवाईत, सासष्टी तालुक्यात नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव कावलेकर, अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप गावडे प्रियोळकर व अभिषेक नाईक आणि चालक डॉमिंगोस गोंसाल्विस यांच्या पथकाने रात्रीच्या वेळी विविध तक्रारींची चौकशी केली. यात ४ फेरीवाले आणि ५ उपाहारगृहांची पाहणी करण्यात आली. हे व्यावसायिक अस्वच्छ वातावरणात काम करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ७,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय, आके-मडगाव येथील एका किरकोळ दुकानात एक्सपायरी डेट उलटून गेलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले. सुमारे ४,३०० रुपये किमतीचा हा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.


हेही वाचा
सर्व पहा