वास्को : न्यू वाडे, वास्को येथे शेवटच्या बसथांबा परिसरातील एका दुकानवजा खोलीत एलपीजी सिलिंडरमधील गॅसची गळती होऊन आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटात मायलेकी जखमी झाल्या. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दोघींनाही तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) रुग्णालयात हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम गावस यांच्या मालकीची ही जागा वीरप्पा यांना भाड्याने देण्यात आली होती. दुकानवजा खोलीत एलपीजी गॅसची गळती झाल्याने बंदिस्त जागेत ज्वलनशील वायू जमा झाला. त्यानंतर या वायूने पेट घेतल्याने अचानक आग लागून स्फोट झाला. या दुर्घटनेत मायलेकी जखमी झाल्या. दोघींनाही तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसराची पाहणी केली. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली आणि स्फोटामागील अन्य कारणांचा तपास पोलीस करत आहेत.


