पनामात ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; घरे उद्ध्वस्त, वीजपुरवठा खंडित

नऊ देशांच्या किनारपट्टीवरील त्सुनामीचा इशारा मागे; धोका कायम; दोघांचा मृत्यू : दक्षिण पनामाच्या किनारपट्टीजवळ शुक्रवारी ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, वीजपुरवठा आणि वाहतूक सेवा विस्कळीत झाल्या. भूकंपानंतर ४० हून अधिक धक्के जाणवले. कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वेडोर, मेक्सिको, पेरू, निकाराग्वा, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर आणि पनामा या नऊ देशांच्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, नंतर हा इशारा मागे घेण्यात आला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th October, 09:58 am
पनामात ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; घरे उद्ध्वस्त, वीजपुरवठा खंडित

पनामा : दक्षिण पनामाच्या किनारपट्टीजवळ शुक्रवारी ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, वीजपुरवठा आणि वाहतूक सेवा विस्कळीत झाल्या. भूकंपानंतर ४० हून अधिक धक्के जाणवले. (Homes damaged, power disrupted, flights hit as 2 killer earthquakes strike Panama) कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वेडोर, मेक्सिको, पेरू, निकाराग्वा, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर आणि पनामा या नऊ देशांच्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, नंतर हा इशारा मागे घेण्यात आला. भूकंपात आतापर्यंत दोघेजण मृत्यू पावल्याचे तर अनेकजण जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे. 

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, पहिल्या शक्तिशाली भूकंपानंतर ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक धक्का बसला. पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पनामाची राजधानी पनामा सिटीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावरील विरळ लोकवस्तीच्या भागात, जमिनीखाली १२.६ किलोमीटर खोलीवर होता.

भूकंपाचे धक्के पनामासह शेजारील कोलंबियामध्येही जाणवले. अनेक इमारतींना तडे गेले, तर काही भागांत इमारतींचे नुकसान झाले. घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर आणि रस्त्यांवर धाव घेतली. मात्र, या भूकंपात काहीजण मृत्यू पावल्याची, जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

सहा प्रांतांतील वीजपुरवठा विस्कळीत

भूकंपामुळे पनामातील सहा प्रांतांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. सुरक्षेच्या कारणास्तव टोचुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. नंतर विमानतळ प्रशासनाने उड्डाणसेवा पुन्हा सुरू केली. पनामा सिटीतील मेट्रो सेवाही काही काळ बंद ठेवण्यात आली. राजधानीतील शाळांमधील विद्यार्थ्यांना लवकर घरी पाठवण्यात आले, तर देशभरातील शाळांचे वर्ग स्थगित करण्यात आले.

भूकंपानंतर कार्यालये रिकामी करण्यात आल्याने राजधानीत वाहतूक कोंडी झाली. अनेक नागरिकांना घरी परतण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, प्रशासनाकडून विविध प्रांतांतील नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे.

पनामा सिटीत ४० सेकंद जमीन हादरली

पनामाच्या भूविज्ञान संस्थेचे संचालक नेस्टर लुके यांनी हा भूकंप अझुएरो-सोना भ्रंश प्रणालीशी संबंधित असल्याचे सांगितले. या सक्रिय भ्रंश प्रणालीमध्ये दीर्घकाळ साचलेला ताण मुक्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली आणि जमिनीला जोरदार धक्के बसले. पनामा सिटीमध्ये सुमारे ४० सेकंदांपर्यंत जमिनीचे हादरे जाणवल्याचे त्यांनी नमूद केले.


भूकंपानंतर वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बाधित इमारतींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा
सर्व पहा