दिल्लीमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनावर पोलिसांचा बडगा; अनेकांना घेतले ताब्यात

अभिजित दिपके, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासहीत अनेकांचा समावेश; एसआयआरप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेक कुमार यांनी राजीनामा द्यावा व याप्रकरणाचा सखोल तपास करावा, यासाठी दिल्लीमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) आयोजित केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह काही प्रमुख नेत्यांना दिल्ली विमानतळावरच ताब्यात घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे आलेले अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासहीत अनेक नेते, कार्यकर्ते यांनाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्ती नेमक्या कुठे आहेत, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
दिल्लीमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनावर पोलिसांचा बडगा; अनेकांना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : एसआयआरप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेक कुमार यांनी राजीनामा द्यावा व याप्रकरणाचा सखोल तपास करावा, यासाठी दिल्लीमध्ये ‘कॉक्रोच  जनता पार्टी’ने (सीजेपी) आयोजित केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह काही प्रमुख नेत्यांना दिल्ली विमानतळावरच ताब्यात घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे आलेले अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासहीत अनेक नेते, कार्यकर्ते यांनाही ताब्यात घेण्यात आले.  मात्र, ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्ती नेमक्या कुठे आहेत, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 


उपलब्ध वृत्तानुसार, सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची योजना आखली होती. मात्र, पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करून कडेकोट बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे आंदोलकांना जंतरमंतरपर्यंत पोहोचण्यात अडथळे आले.


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी कार्यकर्त्या नेहा बोरा, अर्थतज्ज्ञ जीन ड्रेझ, पश्च‌िम बंगालच्या विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासहीत अनेकांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे.

आंदोलन सुरू ठेवण्याचे अजिंक्य शिंदे यांचे आवाहन

सीजेपीचे नवे घोषित नेतृत्व अजिंक्य शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. पोलिसांनी ज्या ठिकाणी रोखले, तेच ठिकाण आपल्यासाठी जंतरमंतर ठरेल, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आंदोलकांनी राजधानीतील इतर भागांतूनही पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याची माहिती आहे.

 मोठा पोलीस बंदोबस्त

दिल्लीतील प्रसिद्ध बंगला साहिब गुरुद्वारामध्ये काही आंदोलकांनी आश्रय घेतला होता. तेथून जंतरमंतरच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना बसमध्ये बसवून नेले, असा आरोप काही आंदोलकांनी केला आहे.


सकाळपासून जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न करत असतानाही पोलिसांनी पुढे जाऊ दिले नसल्याचे हैदराबाद येथील सॉफ्टवेअर अभियंता अजय झिंगाडे यांनी, सांगितले. या परिसरातील रस्त्यांवरही बॅरिकेडिंग करण्यात आले होते. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिवसभरात किती जणांना ताब्यात घेतले, याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केली नव्हती.

भाजपकडून आंदोलनावर टीका

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने आंदोलनामागे देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही ‘अराजकतावादी शक्ती’ असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. राजधानीतील विविध भागांतून जंतरमंतरकडे जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा