मडगाव: एसटी समाजाला राजकीय आरक्षण नोव्हेंबर अखेरपर्यंत देण्याचे राज्य सरकारचे आश्वासन असून या प्रक्रियेसाठी काही काळ लागू शकतो. मागणीचा पाठपुरावा वेळोवेळी केला जात असून सरकार नक्कीच आरक्षण देईल, असा आमचा विश्वास आहे, असे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.
राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनेही करण्यात आलेली होती. या प्रश्नाबाबत बोलताना आमदार गोविंद गावडे यांनी राज्य सरकारने एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असून सरकार ते नक्की पूर्ण करेल, असे स्पष्ट केले.
आमदार गावडे यांनी सांगितले की, एसटी समाजाच्या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून चळवळ सुरू आहे. या चळवळीच्या सुरुवातीपासून एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. या मागणीसाठी वारंवार ठराविक कालावधीने पाठपुरावा करत आहोत. याआधीच्या आंदोलनावेळी दोन महिन्यांचा अवधी या प्रक्रियेसाठी राज्य सरकारला दिलेला होता. राज्य सरकारने नोव्हेंबर अखेरपर्यंत एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यासाठी आणखी थोडा काळ समाजाला संयम बाळगावा लागत आहे. ही प्रक्रिया सुरू असून रजिस्ट्रार ऑफ सेन्ससकडून अधिसूचना आलेल्या आहेत.
आरक्षणासाठी आवश्यक मंजुरी मिळालेली आहे. ज्या गोष्टी कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक आहेत, त्या केल्या जात आहेत आणि त्या प्रक्रियेला थोडा कालावधी लागतो हे आम्हालाही माहिती आहे. पण राज्य सरकारकडून दिलेल्या आश्वासनानुसार आरक्षणाची प्रक्रिया केली जाईल असा विश्वास आहे. निवडणुका अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. नोव्हेंबरपर्यंत आरक्षण लागू झाल्यास त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होऊ शकते. अन्यथा आरक्षण लागू झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कालावधी मिळणार नाही. जर आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी निवडणुका जाहीर झाल्यास त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाईल, असेही गावडे यांनी सांगितले.
दिल्लीतील आंदोलनाबाबत विचारणा केली असता, गावडे यांनी सांगितले की, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आंदोलन करण्याचा हक्क दिलेला आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही तत्त्वे, कारणे असतील व आंदोलनाचा हक्क असल्याने कुणीही कुणाला अडवू शकत नाही, असेही स्पष्ट केले.


