नाना पाटेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच

शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट; कुटुंबीयांनीही घातपाताची शक्यता फेटाळली : : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ), बांबोळी येथील डॉक्टरांच्या पथकाने हा अहवाल जारी केला. हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने आणि त्यामागील कोरोनरी धमनीचा आजार ही मृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डॉक्टरांनी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
नाना पाटेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच

पणजी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) (Nana Patekar) यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच (Heart Attack)  झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ), (Goa Medical College Hospital) बांबोळी येथील डॉक्टरांच्या पथकाने हा अहवाल जारी केला. हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने आणि त्यामागील कोरोनरी धमनीचा आजार ही मृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डॉक्टरांनी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

पणजी पोलिसांना ८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयातून नाना पाटेकर यांना मृतावस्थेत आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पणजी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

त्यानंतर त्यांचे पार्थिव बांबोळी येथील गोमेकॉमध्ये नेण्यात आले. तेथे पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी त्यांचे पुतणे प्रसाद पारकर उपस्थित होते. डॉक्टरांच्या पथकाने शवचिकित्सा  करून ८ ऑक्टोबर रोजी अहवाल जारी केला होता.

पहाटे प्रकृती बिघडल्याचा मित्राला संदेश

पोलिसांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी मध्यरात्रीनंतर सुमारे २.३० वाजता कौटुंबिक मित्र अमेय नाईक यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवून प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. मात्र; प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नाईक यांना दूरध्वनी केला. पहाटे साडेतीनच्या सुमारास संदेश पाहिल्यानंतर नाईक तातडीने दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

त्यावेळी नाना पाटेकर कपडे घालून सोफ्यावर बसले होते. मात्र, त्यानंतर ते बेशुद्ध झाले. नाईक यांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने मणिपाल रुग्णालयाची आपत्कालीन रुग्णवाहिका बोलावली. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता फेटाळली

पोलिसांनी नाना पाटेकर यांचे पुतणे प्रसाद पारकर आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांचे जबाब नोंदवले. दोघांनीही मृत्यूबाबत कोणताही घातपाताचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पणजी पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली पुढील चौकशी सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा