समुद्रकिनाऱ्यांवर छत्र्या, खाटांसाठी गोवा पर्यटन खात्याकडून अर्ज खुले

किनारपट्टीला लागून खासगी जमीन असलेल्या पात्र खासगी शॅक चालक, हॉटेल्स आणि हॉटेल्स/रेस्टॉरंट्सकडून डेक बेड्स, छत्र्या, टेबल्स आणि खुर्च्या ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज मागवले आहेत.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th October, 11:52 pm
समुद्रकिनाऱ्यांवर छत्र्या, खाटांसाठी गोवा पर्यटन खात्याकडून अर्ज खुले

पणजी : पर्यटन खात्याने सध्याच्या 'गोवा राज्य शॅक धोरण' आणि 'गोवा पर्यटन व्यवसाय नोंदणी कायदा, १९८२'ला अनुसरून १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ मे २०२७ या कालावधीसाठी किनारपट्टीला लागून खासगी जमीन असलेल्या पात्र खासगी शॅक चालक, हॉटेल्स आणि हॉटेल्स/रेस्टॉरंट्सकडून डेक बेड्स, छत्र्या, टेबल्स आणि खुर्च्या ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज मागवले आहेत. या संदर्भात पर्यटन खात्याने कडक नियम व अटी घातल्या आहेत, तसेच दरही निश्चित केले आहेत.
समुद्रकिनाऱ्याच्या भागात सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अर्जदारांचे/संस्थांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ज्या अर्जदारांनी २२ जून २०२६ च्या जाहीर सूचनेनुसार डेक बेड्स, छत्र्या, टेबल्स आणि खुर्च्या ठेवण्यासाठी अर्ज केले होते, त्यांनी केवळ नूतनीकरणासाठी अर्ज सादर करावा.
परवान्याअंतर्गत डेक बेड्स, छत्र्या, टेबल्स आणि खुर्च्या ठरवून दिलेल्या भागात जागेची पाहणी करून आणि पर्यटकांच्या वाहतुकीत/येण्या-जाण्यात अडथळा येणार नाही याची खात्री करूनच दिल्या जातील.
अर्ज पर्यटन खात्याच्या संकेतस्थळावर ८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या काळात उपलब्ध असतील. परवानगी देण्यापूर्वी खात्याकडे सुचवलेल्या जागेची पाहणी आणि पडताळणी करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे, ज्याद्वारे समुद्रकिनाऱ्याचा परिसर, जागेची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती आणि सरकारी जमिनीवर अतिक्रमण आहे की नाही याची तपासणी केली जाईल.

डेक बेड्स आणि छत्र्या वापराचे नियम
वाहतुकीसाठी मार्ग : पर्यटकांच्या येण्या-जाण्यासाठी किमान १ मीटरचा स्पष्ट मार्ग सोडणे बंधनकारक.
अडथळा आणण्यास मनाई : जीवरक्षक, किनारे स्वच्छ करणारे कर्मचारी किंवा कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला अडथळा येईल अशा प्रकारे वस्तू ठेवता येणार नाहीत.
वेळेचे बंधन : सर्व डेक बेड्स आणि छत्र्या सूर्यास्तानंतर त्वरित हटवणे आवश्यक.
क्रमांक टाकणे : प्रत्येक डेक बेड संचावर परवाना क्रमांक स्पष्टपणे लिहिलेला असावा.
इतर अटी : परवानगी केवळ ठरवून दिलेल्या जागेतच मिळेल आणि भरती रेषेचे नियम पाळणे बंधनकारक असेल

शुल्क रचना
नवीन अर्जासाठी अर्ज शुल्क १०,००० रुपये (बिगर-परतावा), नवीन नोंदणीसाठी सुरक्षा ठेव ५० हजार रुपये (परतावा योग्य), डेक बेड्स आणि छत्र्या ठेवण्यासाठी शुल्क १ लाख ४५ हजार रुपये आणि नवीन अर्जासाठी 'गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'कडे भरायचे प्रक्रिया शुल्क १२,१०० रुपये (बिगर-परतावा) इतके आहे.

हेही वाचा
सर्व पहा