मडगाव : येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर चौकटीतून आणि पारदर्शक पद्धतीनेच पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी ही प्रक्रिया २००४ मध्ये पार पडली होती. तब्बल २१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता ही पडताळणी करण्यात आल्यामुळेच मोठ्या प्रमाणात नावे रद्द झाल्याचे समोर येत आहे. ज्या मतदारांची नावे या यादीतून काही कारणास्तव रद्द झाली असतील, त्यांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक सहा भरून आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
फातोर्डा मतदारसंघातील स्थिती
फातोर्डा मतदारसंघात साडेचार हजार मतदारांची नावे रद्द झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना दामू नाईक यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आगामी निवडणुकीत आपला पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच काही मंडळी असा खटाटोप करत असल्याचे ते म्हणाले. ही मतदार पडताळणी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊनच करण्यात आलेली आहे. या प्रदीर्घ काळात अनेक मृत व्यक्ती तसेच मूळ निवासस्थान सोडून दुसरीकडे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे जुन्या यादीत तशीच राहिली होती. त्यामुळे ही नवीन सुधारीत प्रक्रिया अमलात आल्यानंतर या नावांचा आपोआपच सफाया झाला असून यात कोणतीही अनियमितता झालेली नाही, असा पुनरुच्चार नाईक यांनी केला.
काहींना राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच युतीची गरज
राजकीय समीकरणांवर भाष्य करताना दामू नाईक म्हणाले की, स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच काही पक्षांना आणि नेत्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याची गरज भासते. काही चंचल वृत्तीचे राजकीय नेते सातत्याने निष्ठा बदलत कधी टीएमसी, कधी काँग्रेस तर कधी आम आदमी पक्षाचा आसरा घेतात. नेत्यांनी मतदारांची प्रतारणा करू नये आणि सत्तेचा किंवा लोकप्रियतेचा अहंकार बाळगू नये, कारण शेवटी सर्वांनाच जमिनीवर यावे लागते. भाजप पक्षाचे अध्यक्ष या नात्याने राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक वाढ करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे आणि फातोर्डा मतदारसंघही त्याला अपवाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षनिष्ठा, उमेदवारी आणि कार्यकर्त्यांचे स्थान
पक्षातील उमेदवारी आणि युवा नेत्यांच्या मागण्यांबाबत विचारले असता त्यांनी पक्षाची चौकट स्पष्ट केली. भाजप हा तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टावर आणि बळावर उभा राहिलेला पक्ष आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला राजकारणात संधी देत त्याला आमदार आणि मंत्री बनवण्याचे काम भाजपनेच केले आहे. फातोर्डा किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून उमेदवारी देण्याचा निर्णय हा पक्षाची वरिष्ठ मध्यवर्ती यंत्रणा घेते. पक्षाने आदेश दिल्यास एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपण कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास आणि निवडणूक लढवण्यास तयार आहोत. युवा नेते संकेत आर्सेकर यांनी केलेल्या मागणीच्या संदर्भात बोलताना, कार्यकर्त्यांच्या भावना आणि सूचना ऐकून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे काम वरिष्ठ नेतृत्व करेल, असेही नाईक यांनी शेवटी नमूद केले.


