क्रूझवर नोकरीचे आमिष दाखवून काणकोणच्या युवकाला १ लाखांचा गंडा!

काणकोण येथील २६ वर्षीय तरुणाला नामांकित क्रूझवर नोकरी आमिष दाखवून १ लाख २ हजार २३० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
क्रूझवर नोकरीचे आमिष दाखवून काणकोणच्या युवकाला १ लाखांचा गंडा!

मडगाव : नामांकित क्रूझवर नोकरीच्या आमिषाला बळी पडत काणकोण तालुक्यातील एका युवकाला लाखांचा फटका बसला आहे. वेलवाडा-पैंगीण येथील २६ वर्षीय नीरज पैंगीणकर या तरुणाची १ लाख २ हजार २३० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. व्हिसा मंजुरी आणि नोकरी प्रक्रियेच्या शुल्काचा आभास निर्माण करून सायबर भामट्याने अत्यंत चलाखीने ही रक्कम उकळली. स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या आणि चांगल्या भविष्याच्या आशेने जमा केलेले पैसे अचानक एका अज्ञात भामट्याच्या खात्यात जमा झाल्याचे समजताच या पीडित तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

पोलीस तक्रारीतील माहितीनुसार, २९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार नीरज हे मडगाव येथील लोयला हायस्कूल परिसरात असताना एका अज्ञाताने त्यांच्याशी संपर्क साधला. एका आंतरराष्ट्रीय व नामांकित क्रूझ कंपनीत उच्च पदावर निवड झाल्याचे सांगत संशयिताने नीरज यांच्याशी संवाद साधला. त्यांचा पूर्ण विश्वास संपादन करण्यासाठी संशयिताने त्या नामांकित कंपनीचे हुबेहूब दिसणारे बनावट नियुक्तीपत्र त्यांच्याशी शेअर केले. त्या कागदपत्रांवर विश्वास ठेवून नीरज यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आणि याच विश्वासाचा फायदा संशयिताने घेतला.

युपीआयद्वारे पैसे उकळत भामटा गायब

नोकरीची संधी हातची जाऊ नये आणि व्हिसाची मंजुरी वेळेत मिळावी यासाठी तातडीने पैसे भरणे आवश्यक असल्याचे भामट्याने सांगताच नीरज यांनी त्यावर अंधळेपणाने विश्वास ठेवला. २९ जानेवारीच्या सायंकाळपासून ते ३० जानेवारी रोजी दुपारी सव्वातीन वाजेपर्यंतच्या कालावधीत नीरज यांनी युपीआय (UPI) प्रणालीचा वापर करून टप्प्याटप्प्याने एकूण १,०२,२३० रुपये संशयिताने दिलेल्या खात्यावर हस्तांतरित केले. मात्र, पैसे खात्यात जमा होताच संशयिताने आपला खरा चेहरा दाखवला. नोकरीबाबत कोणतीही अधिकृत माहिती न देता त्याने फोन उचलणे आणि संदेशांना प्रतिसाद देणे पूर्णपणे बंद केले.

आपली फसवणूक झाल्याचे आणि हातातील पैसे गेल्याचे स्पष्ट होताच नीरज यांनी तात्काळ मडगाव पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत अज्ञाताविरोधात तक्रार नोंदवली. मडगाव पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक स्वदेश देसाई करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा