फोंडा किल्ला, म्युझियमचे होणार खासगीकरण

फोंडा किल्ला संकुल आणि छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियमची देखभाल, तसेच संचालन करण्यासाठी गोवा पर्यटन विभागाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर खासगी ऑपरेटर नेमण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत. हा प्रस्तावित करार १५ वर्षांचा असून, तो आणखी १५ वर्षांसाठी वाढवण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.

09th October, 11:24 pm
फोंडा किल्ला, म्युझियमचे होणार खासगीकरण

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
फोंडा किल्ला संकुल आणि छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियमची देखभाल, तसेच संचालन करण्यासाठी गोवा पर्यटन विभागाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर खासगी ऑपरेटर नेमण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत. हा प्रस्तावित करार १५ वर्षांचा असून, तो आणखी १५ वर्षांसाठी वाढवण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.
फार्मागुडी येथील फोंडा किल्ला आणि डिजिटल म्युझियमचा एकात्मिक वारसा आणि पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात आला आहे. या प्रकल्पात डिजिटल प्रदर्शने, परस्परसंवादी गॅलरी, पर्यटक सुविधा, पार्किंग, खाद्यपेय सुविधा, स्मृतीचिन्ह विक्रीची दुकाने आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठीच्या जागांचा समावेश आहे.
निवडल्या जाणाऱ्या ऑपरेटरला किल्ल्याचा परिसर, म्युझियम, डिजिटल उपकरणे, प्रदर्शने, परिसराचे सुशोभीकरण आणि गोपाळ गणपती मंदिराजवळील पार्किंगची जागा यांची देखभाल करावी लागणार आहे. तसेच आवश्यक व्यवस्थापकीय, तांत्रिक, स्वच्छता आणि सुरक्षा कर्मचारी नेमण्याची जबाबदारीही ऑपरेटरवर असेल.
प्रकल्पाचा ताबा घेताना ऑपरेटरला सुविधांच्या सध्याच्या स्थितीची पाहणी करून संचालन आणि व्यवस्थापन आराखडा तयार करावा लागेल. या आराखड्यामध्ये कर्मचारी व्यवस्था, पर्यटकांची ये-जा, तिकीट व्यवस्था, देखभाल, सुरक्षा, प्रसिद्धी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महसूल मिळवून देणाऱ्या उपक्रमांचा समावेश असेल. हा आराखडा दरवर्षी अद्ययावत करावा लागेल.
पर्यटकांना आकर्षित करण्याची जबाबदारी ऑपरेटरची
म्युझियममधील डिजिटल माहिती (कंटेंट) अद्ययावत ठेवणे, नियमित कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि पर्यटकांना आकर्षित करणे ही जबाबदारी खासगी ऑपरेटरची असेल. तसेच प्रकल्पाचे व्यावसायिक व्यवस्थापन करताना किल्ल्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वैशिष्ट्य जपणे ऑपरेटरवर बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा