पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीच्या हालचालींना वेग येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या महाआआघाडीत (‘ग्रँड अलायन्स’) एनसीपी सहभागी होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिल्याचे डिसोझा यांनी सांगितले.
डिसोझा यांच्या म्हणण्यानुसार, आगामी निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याची माहिती शरद पवार यांनी दिल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट केले.
गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील, असा विश्वासही डिसोझा यांनी व्यक्त केला.
एनसीपीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी गोव्यात येऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. त्यातूनच एनसीपी यापुढे होणार विरोधी पक्षांच्या महाआघाडीत सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने एनसीपीने बोलणीही सुरू केल्याच्या माहितीला डिझोझा यांच्या वक्तव्यावरून दुजोरा मिळत आहे.


