पणजी : सत्तरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या आणि नागरिकांच्या घरातून तांब्याची भांडी चोरणाऱ्या चोरांच्या टोळीचा स्थानिकांनी भांडाफोड केला आहे. सत्तरी तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि परिसरामध्ये गेल्या काही काळापासून या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे भुरटे चोरटे प्रामुख्याने दिवसाच्या सुमारास इको गाडीतून फिरून गावागावांत रेकी करत असत आणि बंद घरांना लक्ष्य करून तांब्याची भांडी लांबवत असत. विशेषतः भाड्याच्या घरांच्या आवारातील भांडी आणि पाण्याच्या तांब्याच्या मडक्यांना हे चोरटे आपले मुख्य लक्ष्य बनवत असत. या चोरांचा वावर सुर्लापासून धावे, नानेली, नगरगाव आणि सातोडे ते पर्ये यांसारख्या विविध भागांत पसरला होता.
काल शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास हे चोरटे तुळशीमळ-पर्ये येथील एका भागात नेहमीप्रमाणे चोरी करण्यासाठी दाखल झाले. एका घराच्या मागील वाटेने आत प्रवेश करून तेथील तांब्याची मडकी चोरत असतानाच, घरातल्या एका महिलेला अचानक खडखड झाल्याचा आवाज ऐकू आला. महिलेने प्रसंगावधान राखत न घाबरता आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे लोक त्वरित गोळा झाले. हा अचानक झालेला गोंधळ पाहून दोन चोरटे अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, सतर्क स्थानिकांनी घराबाहेर जवळच उभी असलेल्या इको गाडीत डोकावून पाहिले. गाडीत एकजण गाढ झोपला असल्याचे त्याच्या नजरेस आले.

स्थानिकांनी कोणतीही भीती न बाळगता त्या गाफील झोपलेल्या चोराला गाडीतून खेचत बाहेर काढले आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याच्याकडून परिसरातील सर्व चोरीची माहिती वदवून घेतली. कमलेश गुरव (वय २२) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. तर त्याचे अन्य दोन साथीदार पवन संजय नाईक (वय २८) आणि विजय तुकाराम भोसले (वय २६, सर्व रा. कारापूर) हे अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले होते. हे सर्व जण कारापूर-तिस्क येथील एका स्क्रॅप यार्डवर ही चोरी केलेली तांब्याची भांडी आणि मडकी विकत असल्याचे गुरव याने सांगितले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे चोरटे आधी दुचाकीवरून रेकी करत आणि नंतर चारचाकी गाड्यांद्वारे येऊन हात साफ करत असत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे साहित्य व ती इको गाडी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही संशयितांना बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर तपास वेगाने सुरू आहे..


