सत्तरीत भांडी चोरांचा धुमाकूळ, पर्ये-सत्तरीत तिघा संशयितांना चोप

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10th October, 09:12 pm
सत्तरीत भांडी चोरांचा धुमाकूळ, पर्ये-सत्तरीत तिघा संशयितांना चोप

वाळपई : चोर्ला घाटातील काही गावांमध्ये तसेच सुर्ला, पर्ये, नानेली, झर्मे, नगरगाव, सातोडे, धावे आणि सत्तरी तालुक्यातील इतर काही गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून भांडी चोरीचे अनेक प्रकार घडले होते. घरफोडी करून घरातील तांब्याची आणि पितळीची भांडीच गेल्या दोन महिन्यांत चोरीला गेली. मात्र, दोन महिने हुलकावणी देणारे चोर पर्ये-सत्तरी येथे तांब्याच्या भांड्यांची चोरी करताना सापडले आणि त्यांचे सर्व प्रताप समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी तिघा संशयितांची नावे समोर आली असून, पुढील तपास सुरू आहे.


कारापूर येथील रहिवासी असलेल्या तिघांवर या चोरीप्रकरणी संशय व्यक्त करण्यात आला आहे. कमलेश गुरव (वय २२), पवन संजय नायक (वय २८) आणि विजय तुकाराम भोसले (वय २६) अशी संशयितांची नावे आहेत. या तिघांचा तांब्याच्या भांड्यांच्या चोरीप्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिघांनाही वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पितळीच्या आणि तांब्याच्या भांड्यांना बाजारात चांगली मागणी आणि किंमत असल्याने अशा वस्तूंच्या चोरीचा मार्ग या संशयितांनी धरला होता. या प्रकरणात चोरी नेमकी कुठे झाली, किती किमतीची भांडी चोरीला गेली आणि चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे का, याबाबत अधिकृत तपशील उपलब्ध झालेला नाही.

दरम्यान, या प्रकरणातील संशयितांची भूमिका, चोरीच्या घटनेमागील कारणे आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा
सर्व पहा