म्हापसा : कळंगुट येथे मार्केटजवळ (Calangute Market) जीएसआयडीसीच्या मार्फत बांधकाम सुरू असलेल्या गटारात कोसळून पोटात लोखंडी सळी घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या नवी मुंबईस्थित मणिपुरी पादचार्याचा मृत्यू झाला. नागशमनी ए. शिमरे (३२ वर्षे, रा. करंझाळे, ताळगाव व मूळ नवी मुंबई) असे मृत युवकाचे नाव आहे. मयत हा गोव्यात नेल टॅक्निशियन म्हणून स्पा सलूनमध्ये कामाला होता.
ही घटना मंगळवारी १३ रोजी रात्री ११.३०च्या सुमारास घडली. दारूच्या नशेत रस्त्याच्या बाजूने चालत जाणार्या मृत नागशमनी शिमरे याचा तोल जाऊन तो गटारात कोसळला. नेमकी काम सुरू असलेल्या गटारावरील लोखंडी सळी त्याच्या पोटात घुसली. ही सळी पोटातून आरपार झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
जखमी युवकाला तत्काळ पोलीस रॉबर्ट जीपमधून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथून त्याला बांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे पहाटे ४च्या सुमारास उपचारावेळी त्याचे निधन झाले. घटनेचा पंचनामा कळंगुट पोलीस उपनिरीक्षक साईल वायंगणकर यांनी केला.
दरम्यान, कळंगुटमध्ये टिटो जंक्शन ते बागा जंक्शनदरम्यान रस्त्याच्या कडेला गटाराचे बांधकाम सुरू आहे. गोवा राज्य पायाभूत साधन सुविधा महामंडळाने (Goa State Infrastructure Development Corporation Limited (GSIDC)) हे काम हाती घेतले आहे. काँक्रीट आणि लोखंडी सळ्यांचा वापर करून हे बांधकाम केले जात असून कंत्राटदाराने पादचारी तसेच वाहतुकीसाठी सुरक्षात्मक उपाय व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही. त्यामुळे हे बांधकाम सध्या धोकादायक ठरले आहे. या उघड्या गटारात मयत नागशमनी शिमरे हा युवक कोसळला व त्याचा मृत्यू झाला. घटनेच्यावेळी तो दारूच्या नशेत होता.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे युवकाचा मृत्यू
दरम्यान, कंत्राटदार तसेच जीएसआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधीतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी माजी उपसरपंच सुदेश मयेकर यांनी केली आहे.


