पणजी :अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील संशयित इस्त्रायली नागरिक यानिव्ह बेनाईम ऊर्फ अटाला याच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याने त्याला जामीन मंजूर केल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे, असा दावा सरकारने केला आहे. अटाला हा सराईत अमली पदार्थ तस्कर असल्याचे नमूद करत सरकारने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ रोजी होणार आहे.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला (एएनसी) अटाला पुन्हा अमली पदार्थ तस्करीत सक्रिय झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, तत्कालीन निरीक्षक सजित पिल्लई आणि उपनिरीक्षक दिनदयाळनाथ रेडकर यांच्या पथकाने ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.२५ ते ५ एप्रिल रोजी पहाटे ३.३० या कालावधीत शिवोली येथील अटालाच्या निवासस्थानी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी ५० ग्रॅम कोकेन (किंमत ७.५० लाख रुपये) आणि १२० ग्रॅम चरस (किंमत १.२० लाख रुपये) असा एकूण ८.७० लाखचा अमली पदार्थ जप्त केला. त्यानंतर अटालाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. पुढे एएनसीने त्याच्याविरोधात मेरशी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.सत्र न्यायालयाने २० ऑगस्ट २०२५ रोजी अटालाला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्याच्याविरोधात आरोप निश्चित झाल्यानंतर एएनसीने या जामीन आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने अटालाचा जामीन रद्द करून त्याला शरण येण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी अटाला सत्र न्यायालयात शरण आला. त्यानंतर त्याने पुन्हा जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
सरकारचा जामिनाला विरोध
अटालाकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याने तो जामिनावर सुटल्यास फरार होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारने केला आहे. तसेच, तो सराईत तस्कर असल्याचा दावा करत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. आता २१ रोजी होणाऱ्या सुनावणीत उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.


