बनावट आरोग्य एनओसी प्रकरणात लुथरा बंधूंना सशर्त जामीन

प्रत्येकी एक लाखांची वैयक्तिक हमी; देशाबाहेर न जाण्याची अट

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
12th October, 11:30 pm
बनावट आरोग्य एनओसी प्रकरणात लुथरा बंधूंना सशर्त जामीन

म्हापसा : ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला उत्पादन शुल्क खात्याचा परवाना मिळवण्यासाठी बनावट आरोग्य ना-हरकत दाखला सादर केल्याच्या प्रकरणात सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. बर्च आग दुर्घटना प्रकरणातही अलीकडेच दोघांना जामीन मिळाला होता.
तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले असून, पुरावे कागदोपत्री आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि आरोपी परदेशात पळून जाण्याची शक्यता व्यक्त करत सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला. मात्र, यापूर्वीच्या जामीन कालावधीत पुराव्यांशी छेडछाड केल्याची नोंद नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायाधीश योगेश गावकर यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेचे दोन हमीदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. पुढील सलग तीन सुनावण्यांना उपस्थित राहणे, साक्षीदारांशी संपर्क न साधणे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर न जाणे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप
कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांच्या १३ डिसेंबर २०२५ रोजीच्या तक्रारीनंतर म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या आस्थापनाला दिलेल्या आरोग्य ना-हरकत प्रमाणपत्रात बनावट बदल करून परवाना मिळवण्यासाठी ते सादर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ३० मार्च २०२६ रोजी लुथरा बंधूंना अटक झाली होती. उच्च न्यायालयाने पूर्वीचा जामीन रद्द केल्यानंतर त्यांनी १४ सप्टेंबर रोजी आत्मसमर्पण केले होते.      

हेही वाचा
सर्व पहा