फोंडा : पार-उसगाव येथे रविवारी भर दुपारी रस्त्याच्या बाजूला आसलेल्या घरात अज्ञात चोरांनी घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. घरात राहणाऱ्या दोन युवती दुपारी शेजाऱ्याच्या घरी गेल्या होत्या. अवघ्या २० ते ३० मिनिटांनी घरात परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
रविवारी दुपारी घरात राहणाऱ्या दोन युवती दरवाजे बंद करून शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या. अवघ्या २०-३० मिनिटांत घरात परतल्यानंतर त्यांना ३-४ कपाटांतील कपडे जमिनीवर टाकून अज्ञातांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे आढळून आले. शनिवारी मृत आईचे एक वर्ष पूर्ण झाले होते. दोन्ही युवतींनी तिचे काही सोन्याचे दागिने ३-४ दिवसांपूर्वीच बँकेत ठेवले होते. त्यामुळे काही मोजकेच सोन्याचे दागिने चोरांच्या हाती लागले. घटनेची माहिती त्वरित फोंडा पोलिसांना देण्यात आली. निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
दरम्यान, शुक्रवारी पार- उसगाव भागात अज्ञातांनी कौले काढून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर बाहेर कुणी तरी आल्याचे कळताच अज्ञातांनी तेथून पळ काढला. चोरांनी पळ काढल्याने घरात सोन्याचे दागिने व रोख रक्कम सुखरूप राहिली. परिसरात दोन दिवसांत दोन चोरीच्या घटना उघडकीस आल्याने स्थानिक लोक भयभीत झाले आहेत.


