फर्मागुडी येथील फोंडा शिक्षण संस्थेच्या आवारात उभारलेल्या स्व. रवी नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
..
गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा
डबल इंजिन सरकार चांगल्याप्रकारे काम करत आहे. रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंडा मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे सरकारने लक्ष दिले आहे. स्व. रवी नाईक यांनी सामान्य लोकांचे, मुंडकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. १९ डिसेंबरपर्यंत मुंडकारांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
स्व. रवी नाईक यांच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधून बुधवारी फर्मागुडी येथील फोंडा शिक्षण संस्थेच्या आवारात उभारलेल्या स्व. रवी नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती गणेश गावकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, जलपेयमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार गोविंद गावडे, नीलेश काब्राल, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, जयंत कुलकर्णी, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रितेश नाईक, माजी नगरसेवक रॉय नाईक व इतर उपस्थित होते.
रवी नाईक यांनी राजकारण करताना समाजकारणाकडे लक्ष दिले. नगरसेवक ते मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात त्यांनी सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याला अधिक महत्त्व दिले. पहिल्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने स्व. रवी नाईक यांचा पुतळा फर्मागुडी येथे उभारण्यात आला आहे. कुर्टी येथील स्व. रवी नाईक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येही लवकरच त्यांचा अर्ध पुतळा उभारला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर व आमदार गोविंद गावडे यांनीही विचार व्यक्त केले.
रवी नाईक खरे लोकनेते : तानावडे
खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, स्व. रवी नाईक यांनी राजकारणात असताना विरोधक आणि सर्वसामान्य लोक यांच्याशीही चांगले नाते निर्माण केले होते. त्यामुळे गोव्याच्या ग्रामीण भागातील लोकांमध्येही रवी नाईक यांच्याबद्दल आदर होता. यावरून रवी नाईक हे खरे लोक नेते होते, हे स्पष्ट होते.
गरिबांच्या शिक्षणाची होती रवी नाईकांना चिंता : दामू
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, स्व. रवी नाईक यांनी केलेले कार्य महान आहे. गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. गरीब कुटुंबातील युवा वर्ग शिक्षणापासून वंचित राहू नये याची रवी नाईक यांना यांना चिंता होती.


