कासारवर्णेत दिवस-रात्र विजेचा लपंडाव

वीज खात्याच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांची नाराजी

Story: गोवन वार्ता। विशेष प्रतिनिधी |
2 hours ago
कासारवर्णेत दिवस-रात्र विजेचा लपंडाव

पेडणे : कासारवर्णे गावात गेल्या काही दिवसांपासून दिवसा आणि रात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. वीज जाण्यामागील नेमके कारण स्पष्ट करून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी मोपा पीडित जनसंघटनेचे सदस्य उदय महाले यांनी केली आहे.
पावसाळ्यात झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडणे, फिडर ट्रिप होणे किंवा खराब हवामानामुळे वीजपुरवठा खंडित होणे समजण्यासारखे आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत वीजपुरवठा तुलनेने सुरळीत होता. मात्र, आता वारंवार वीज गायब होत असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर वेगवेगळी कारणे सांगितली जातात; मात्र समस्या कधी सुटणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे महाले यांनी सांगितले.
सध्या नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त गावातील मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, दांडिया तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांसाठी ध्वनिव्यवस्था आणि प्रकाशयोजनेवर हजारो रुपये खर्च केले जातात. मात्र, कार्यक्रम सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यास आयोजकांसह भाविकांचीही गैरसोय होते. वीज खात्याने कासारवर्णेतील वीजवाहिन्या, फिडर, ट्रान्सफॉर्मर आणि संबंधित यंत्रणेची तांत्रिक तपासणी करून बिघाडाचे नेमके कारण शोधावे व वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा