मडगाव : कोलवा पंचायत क्षेत्रातील सेर्नाभाटी, वानेली, कोलवा आणि गांदावली या चार गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या कायम आहे. कमी दाबाने होणारा पुरवठा, अनियमित पाणीपुरवठा आणि नळांमधून येणारे दूषित पाणी यांमुळे ७०९ कुटुंबांतील सुमारे २,८३६ रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी विविध सरकारी खात्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१ मे ते २६ सप्टेंबरदरम्यान राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेत पाणी समस्येची तीव्रता समोर आली. मोहिमेत सहभागी झालेल्या ७०९ कुटुंबांपैकी ६७१ कुटुंबांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. तर ४९९ कुटुंबांनी अनियमित पुरवठ्याचा आणि २९ कुटुंबांनी वारंवार पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होत असल्याचा प्रश्न मांडला.
काही घरांमध्ये नळांमधून चिखलमिश्रित गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या समस्येचा परिणाम परिसरातील सुमारे ४४ टक्के लोकसंख्येवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलवाहिन्यांची क्षमता, पंपिंग व्यवस्था, पाण्याच्या दाबाचे विभाग आणि वितरणादरम्यान होणारी गळती यांचे सविस्तर मूल्यांकन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यानुसार आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन नवीन निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवर तात्पुरते निर्बंध घालावेत. तसेच हॉटेल्स आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांमधील जलतरण तलावांच्या वापरावर योग्य नियंत्रण ठेवावे, अशी सूचनाही ग्रामस्थांनी केली आहे.
संयुक्त बैठक घेऊन कृती आराखडा तयार करा
पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. पंचायत, सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित अन्य खात्यांची संयुक्त बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
चारही गावांतील पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित खात्यांनी समन्वयाने काम करावे. निश्चित कालमर्यादेत अंमलबजावणी करता येईल असा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


