आयआयटी, आयआयएममध्ये प्रवेश घेणाऱ्या गोव्यातील विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंत पुरस्कार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
आयआयटी, आयआयएममध्ये प्रवेश घेणाऱ्या गोव्यातील विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंत पुरस्कार

पणजी : आयआयटी, आयआयएम आणि आयआयएससी बंगळुरू यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गोव्यातील विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचा पुरस्कार देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक पुरस्कार मिळणार आहे.

अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश मिळवणारे गोव्यातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी १५ वर्षांच्या वास्तव्याच्या अटीसह उच्च माध्यमिक परीक्षा गोव्यातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मूळ गोमंतकीयांसाठी सात वर्षांचे वास्तव्य ग्राह्य धरले जाणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आयआयटी, आयआयएम, आयआयएससी बंगळुरू आणि एम्स या संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.

इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, इन्सिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स (चेन्नई), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नॅशनल इन्सिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी हे संस्थेत प्रवेस घेतल्यास ७५ हजारांचा पुरस्कार मिळणार आहे.

एनआयटी, आयआयआयटी, नॅशनल लॉ स्कूल आणि हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये दिले जातील. तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आणि होमिओपॅथी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचा पुरस्कार दिला जाणार आहे.

अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार द्यायचा की नाही, याचा निर्णय निवड समिती घेणार आहे. या योजनेची अंमलबजावणी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत केली जाणार आहे.


हेही वाचा
सर्व पहा