मोपा पोलीस ठाणे बंद करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांचा विरोध

कासारवर्णेतील संघटना आक्रमक : निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19 mins ago
मोपा पोलीस ठाणे बंद करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांचा विरोध

पेडणे : मोपा पोलीस ठाणे बंद करण्याच्या किंवा त्याचे कार्यक्षेत्र कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरात लोकवस्ती आणि वाहनांची वर्दळ वाढली असताना पोलीस सेवा कमी करणे गैरसोयीचे ठरेल, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
विमानतळ प्रकल्पामुळे मोपा परिसरात विविध राज्यांतील कामगार, कर्मचारी आणि व्यावसायिकांची वर्दळ वाढली आहे. अपघात, वादविवाद आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पेडणे तालुक्यात पूर्वी एकच पोलीस ठाणे कार्यरत होते. मात्र, वाढती लोकसंख्या, पर्यटन व्यवसाय, किनारपट्टीवरील वाहतूक आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन पेडणे, मांद्रे आणि मोपा अशी स्वतंत्र पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात आली. विमानतळ परिसरातील वाढती वर्दळ, अपघात, स्थानिक वाद आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्यासाठी मोपा पोलीस ठाणे महत्त्वाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे ठाणे बंद केल्यास नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी पेडणे पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कासारवर्णे देवस्थान समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मोपा पीडित जन संघटनेच्या सदस्यांनी या संभाव्य बदलाला विरोध दर्शविला आहे. वारखंड ग्रामपंचायतीने यासंदर्भात लेखी भूमिका मांडल्याची माहिती आहे. दरम्यान, मोपा पोलीस ठाण्याबाबत कोणता अधिकृत निर्णय झाला आहे किंवा कार्यक्षेत्रात नेमका कोणता बदल प्रस्तावित आहे, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे.
मोपा परिसरातील आरोग्य सुविधांबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कासारवर्णे येथील पूर्वा सरकारी रुग्णालयात रुग्णवाहिका, एक्स-रेसाठी नियमित कर्मचारी आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांची आवश्यकता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, तसेच पोलीस ठाण्याच्या संभाव्य बंदबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी उदय महाले यांनी केली आहे.
निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
मोपा पोलीस ठाणे सध्याच्या स्वरूपात सुरू ठेवावे. अन्यथा नागझर, कासारवर्णे किंवा चांदेल परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याचा विचार करावा, अशी मागणी महाले यांनी केली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेशी तडजोड झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा
सर्व पहा