गोव्यातून चालणाऱ्या ड्रग्ज नेक्ससवर तेलंगणा पोलिसांच्या 'ईगल'ची करडी नजर

गोवा आणि तेलंगणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत, पुन्हा एका आंतरराज्यीय ड्रग्स तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक करण्यात आली असून, हा गट एक हजाराहून अधिक जणांना ड्रग्स पुरवत होता अशी माहिती समोर आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
50 mins ago
गोव्यातून चालणाऱ्या ड्रग्ज नेक्ससवर तेलंगणा पोलिसांच्या 'ईगल'ची करडी नजर

पणजी : गोव्यातून चालणाऱ्या ड्रग्ज तस्करीची नाळ तेलंगणातील नेक्ससची जोडलेली असल्याचे तपास यंत्रणांनी शोधून काढल्यापासून यात गुंतलेल्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. नुकताच एका आंतरराज्यीय ड्रग्स तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तेलंगणा पोलिसांच्या 'EAGLE फोर्स'ने हैदराबाद आणि सायबराबाद पोलिसांच्या सहकार्याने तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोव्यात एकाच वेळी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय ड्रग्स तस्करी नेटवर्कमधील तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. या तस्करांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील एक हजार पन्नासपेक्षा अधिक ग्राहकांना ड्रग्सचा पुरवठा केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची ओळख प्रीतेश नारायण बोरकर उर्फ बाबू उर्फ खली, बशारत अहमद धग्गा उर्फ बिलाल आणि तरुण अशी पटवण्यात आली आहे. या कारवाईसाठी सुरक्षा यंत्रणांनी टेक्निकल सर्वेलन्स आणि स्थानिक खबऱ्यांचा वापर केला होता. मुख्य संशयित प्रीतेश बोरकर हा गोव्यातील हणजूण परिसरातून आपले काळे धंदे चालवत होता आणि त्याने तेलंगणासह शेजारील राज्यांत ग्राहकांचे मोठे जाळे तयार केले होते. त्याला गोव्यातून ताब्यात घेतल्यानंतर ट्रान्झिट रिमांडद्वारे पुढील चौकशीसाठी तेलंगणात आणण्यात आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही हैदराबादमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असून तो काही गुन्ह्यांमध्ये फरार होता.

दुसऱ्या एका स्वतंत्र कारवाईत उत्तर गोव्यात बशारत अहमद धग्गा याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून १३ एलएसडी ब्लॉट, ८ एक्सटसी पिल्स आणि सुमारे शंभर ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. या जप्त केलेल्या पदार्थांची किंमत अंदाजे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या तस्करांचे नायजेरियन नागरिक आणि इतर मोठ्या पुरवठादारांशी संबंध असल्याचे उघडकीस आले असून, तेथून ते महाराष्ट्रासह विविध राज्यांत माल मागवत होते. या रॅकेटमध्ये अडकलेल्या एका तरुणाला उपचारासाठी पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले असून, पोलीस या नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी कसून तपास करत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा