पणजी : सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून, राज्य सरकारतर्फे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी १० तालुक्यात ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) पेडणे येथील सरकारी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर अन्य मंत्री विविध तालुक्यात उपस्थित राहतील. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या अडचणी आणाव्यात असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
जनतेपर्यंत शासन पोहोचवण्यासाठी, नागरिकांना मंत्र्यांकडे थेट त्यांच्या वैयक्तिक अडचणी मांडण्यासाठी आणि सरकारी सेवा व कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाद्वारे नागरिक राज्यामधील निर्धारित ठिकाणांवर मंत्र्यांसोबत थेट संवाद साधू शकतील. कार्यक्रम स्थळी उपलब्ध सेवा समजून घेण्यासाठी, सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आणि लाभ मिळविण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन घेण्यासाठी समर्पित काऊंटर्स उभारले जाणार आहेत.
‘माझे घर योजना’ आणि महसूल खात्याच्या सेवांची माहिती देण्यासाठी, काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी काउंटरवर उपजिल्हाधिकारी, मामलेदार उपस्थित राहणार आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आणि इतर कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी समाज कल्याण खात्याचे अधिकारी उपस्थित असतील. महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून गृह आधार योजना, लाडकी लक्ष्मी आणि इतर योजनांसाठी मार्गदर्शन दिले जाईल. तर कृषी अधिकारी विविध कृषी योजनांची माहिती, अर्ज आणि पुस्तके उपलब्ध करून देतील.
वेळापत्रक आणि ठिकाणे
तालुका / उपस्थित मंत्री / ठिकाण.
पेडणे /डॉ. प्रमोद सावंत / एसएसए शासकीय महाविद्यालय, विर्नोडा, पेडणे.
सासष्टी (मडगाव) / विश्वजित राणे / रवींद्र भवन, मडगाव.
डिचोली/ निळकंठ हळर्णकर/ नारायण झांट्ये वाणिज्य महाविद्यालय/ डिचोली.
सत्तरी / सुदिन ढवळीकर/ कदंब बस स्थानक हॉल, वाळपई, सत्तरी.
तिसवाडी/ रमेश तवडकर /ग्रामपंचायत हॉल, गुडीवाडा, नेवरा, तिसवाडी.
फोंडा/ सुभाष फळदेसाई /राजीव कला मंदिर,फोंडा.
मुरगाव / रोहन खंवटे /रवींद्र भवन, वास्को.
सांगे / मॉविन गुदिन्हो | नगर पालिका हॉल, सांगे.
धारबांदोडा / सुभाष शिरोडकर/ किर्लपाळ-दाभाळ पंचायत हॉल, धारबांदोडा.
काणकोण / दिगंबर कामत/ रवींद्र भवन, काणकोण.


