मडगाव : रेल्वे प्रवासादरम्यान एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यास ती परत मिळण्याची आशा धूसर असते, मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचा हरवलेला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाला आहे. 'ऑपरेशन अमानत'अंतर्गत कारवाई करत आरपीएफने सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र शोधून संबंधित प्रवाशाच्या स्वाधीन केले आहे. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली. गाडी क्रमांक १६५८५ ही उडुपी रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर 'रेल मदत' पोर्टलवर एक तक्रार दाखल झाली होती.
या तक्रारीची तात्काळ दखल घेत आरपीएफच्या जवानांनी गाडीच्या ए२ (A2) डब्यात कसून शोधमोहीम राबवली. तपासणीदरम्यान बेडशीटमध्ये गुंडाळलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जवानांच्या हाती लागले. मंगळसूत्र मिळताच अधिकाऱ्यांनी प्रवाशाशी संपर्क साधला आणि कागदपत्रांची आवश्यक पडताळणी करून ते सन्मानाने स्वाधीन केले. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेबद्दल प्रवाशाने मनापासून आभार मानले असून, प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.


