वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. इलिनॉय राज्यातील अरोरा येथे असलेल्या एका प्रमुख हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार घडवून आणण्याचा एक मोठा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि वर्णद्वेषी विचारसरणीचा एक जाहीरनामा सापडला आहे. सहकाऱ्याने दाखवलेली प्रसंगावधानता आणि हल्लेखोराजवळील बंदूक ती लोड करताना ऐनवेळी जॅम झाल्यामुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अलेक्झांड्रोस पॅपोराकिस असे या अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव असून तो पॅलाटाईन येथील रहिवासी आहे. तो मागील काही महिन्यांपासून अर्लिंग्टन हाईट्स येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये कॅशियर म्हणून काम करत होता. त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो बऱ्याच काळापासून वर्णद्वेषी विचार व्यक्त करत होता, विशेषतः भारतीय समुदायाबद्दल अपशब्द वापरत होता आणि नाझी विचारसरणीचे समर्थन करत होता.
घटनेच्या दिवशी, संशयित तरुणाने अरोरा परिसरातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला लक्ष्य करण्याचा विचार आपल्या सहकाऱ्याजवळ व्यक्त केला होता. त्यानंतर तो आर-स्टाईल रायफल, सुमारे तीनशे काडतुसे, बॉडी आर्मर आणि इतर तांत्रिक साहित्यासह संबंधित मंदिर परिसरात पोहोचला. त्याने मंदिरावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची रायफल ऐनवेळी जॅम झाल्यामुळे (अडकल्यामुळे) तो गोळीबार करू शकला नाही आणि तिथून पसार झाला.
घरी परतल्यानंतर त्याने बंदूक कशी दुरुस्त करावी याचा शोध घेतला आणि आपल्या एका सहकाऱ्याला बंदूक न चालल्याचा व्हिडिओ तसेच स्वतःचे बॉडी आर्मरमधले छायाचित्र पाठवले. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर सहकाऱ्याने व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने आपत्कालीन सेवांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी आणि एफबीआयच्या पथकाने वेगाने सूत्रे हलवून संशयित तरुणाला त्याच्या अपार्टमेंट जवळील पार्किंगमधून ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यादरम्यान अन-रजिस्टर्ड रायफल, लोड केलेले मॅगझीन, काडतुसे, गॅस कॅन आणि नाझी चिन्हे असलेली अनेक सामग्री जप्त केली आहे. तसेच तपासादरम्यान ‘व्हाय आय फॉट’ नावाचा आठ पानी जाहीरनामा हस्तगत करण्यात आला असून, त्यात बिगर-गोऱ्या लोकांबद्दल आणि विशेषतः भारतीयांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी उल्लेख आढळला आहे. या प्रकरणी न्यायालयासमोर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील गनकल्चरवर पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहे.


