पणजी : गोव्यातील (Goa) मये येथील अमर लाडू शेट यांना हस्तकला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कारागिरांच्या सन्मानार्थ दिला जाणारा २०२५ वर्षाचा शिल्पगुरू राष्ट्रीय पुरस्कार (Shilp Guru National Award) जाहीर झाला आहे.
केंद्रीय स्तरावरील निवड समितीची १८ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या पुरस्कारांसाठी कारागिरांची अंतिम निवड करण्यात आली. त्यानुसार हस्तकला क्षेत्रातील निवड झालेल्या पुरस्कारार्थींची यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश संबंधित विभागाकडून देण्यात आले आहेत.
पारंपरिक हस्तकलेचे जतन व संवर्धन, कलात्मक कौशल्य, नावीन्यपूर्ण डिझाइन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे पुरस्कार महत्त्वाचे मानले जातात. शिल्प गुरू आणि राष्ट्रीय पुरस्कारांच्या माध्यमातून अनुभवी कारागिरांच्या योगदानाचा गौरव केला जातो. तर डिझाइन इनोव्हेशन आणि स्टार्टअप व्हेंचर पुरस्कारांद्वारे हस्तकला क्षेत्रातील नव्या संकल्पना व उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळते.
या निवडीमुळे देशातील हस्तकला क्षेत्रातील गुणवंत कारागिरांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे. पारंपरिक कलांना आणि नव्या प्रयोगांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या पुरस्कारासाठी अमर शेट यांची निवड झाल्याने त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी व जवळच्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
९ डिसेंबरला राष्ट्राध्यक्षांच्याहस्ते पुरस्कार देणार
दरम्यान; दिल्ली येथे भारताच्या राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते ९ डिसेंबर रोजी पुरस्कार देण्यात येणार आहे.


