वास्को : साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बायोडायजेस्टरच्या दुरुस्तीसाठी २५ दिवस बंद असणार आहे. मुरगाव तालुक्यातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात अडचणी निर्माण झाल्याने वास्कोसह परिसरात दुर्गंधीचे संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुरगाव नगरपालिकेने (एमएमसी) ‘विंड्रो’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर अवलंबून असलेल्या भागांतील कचरा व्यवस्थापनावर या प्रकल्पाच्या बंदचा परिणाम होत आहे. कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्यात अडथळे निर्माण झाल्यास सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात माहिती देताना मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांनी सांगितले की, मुरगाव नगरपालिका क्षेत्रातील १८ ते २० मॅट्रिक टन ओला कचरा साळगाव प्रकल्पावर जात होता. ९ ऑक्टोबर रोजी प्रकल्प बंद राहणार असल्याचा ईमेल आला होता. त्यानंतर कचरा पाठवण्यास मिळत नाही. २ टन मांस आणि चिकनचा टाकाऊ कचरा सोय होते. राहिलेला कचरा जास्त करून घरातील कचरा असतो. ‘विंड्रो’ तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया करण्यात येणार आहे. साळगाव प्रकल्प दुरुस्त होण्यास २५ दिवस लागणार आहेत.
प्रकल्प बंद असेपर्यंत काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर कचरा नेण्यास अनुमती देण्याची मागणी संबंधित यंत्रणेकडे केली आहे. मात्र, सध्यस्थितीत लोकांना साचलेल्या दैनंदिन कचऱ्यामुळे काही दिवस दुर्गंधी सहन करावी लागणार आहे. काकोडा येथे कचरा नेण्यास अनुमती न मिळाल्यास येथेच सोय करणार. २५ दिवसांत साळगाव प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याठिकाणी नेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नाईक यांनी सांगितले.
कुणी महनीय व्यक्ती येत असल्यास किंवा इतर वेळी येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी रसायनाचा वापर केला जातो. रसायन आणण्यासाठी प्रक्रिया करावी लागणार. रसायनामुळष ५० टक्के तरी दुर्गंधी येणे कमी होत असल्याचे मुख्याधिकारी नाईक यांनी सांगितले. मात्र, पालिकेच्या या निर्णयामुळे वास्कोतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कितपत सुटतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


