मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील आरोग्य सेवांचा विस्तार आणि दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, इस्पितळातील सर्व रिक्त मजले लवकरच थेट रुग्णसेवेसाठी वापरले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मडगाव येथील हॉस्पिसिओच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी नवीन नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नवीन एमआरआय आणि इकोकार्डिओग्राफी सुविधांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मंत्री दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर आणि वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र बोरकर उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्रातील आधुनिक बदलांचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोव्यात लवकरच टेलिमेडिसीन सुविधा सुरू केली जाईल. या सुविधेमुळे रुग्णांना किरकोळ किंवा नियमित तपासणीसाठी इस्पितळात येण्याची गरज भासणार नाही. वैद्यकीय अहवाल आणि रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल ऑनलाइन पाठवून घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचारांची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) ऑनलाइन ओपीडी सेवेचा आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांनी यशस्वीरीत्या लाभ घेतला आहे.
दक्षिण गोव्यातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मोतीडोंगर आणि वेळगे येथे जिल्हा आयुष इस्पितळ सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच ईएसआय मेडिकल कॉलेजची सुरुवातही लवकरच केली जाणार आहे. दक्षिण गोव्यात उभारल्या जाणाऱ्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयात गोमेकॉप्रमाणेच सर्व उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दररोज सुमारे १२०० रुग्ण उपचारासाठी येतात. येथे चार शिफ्टमध्ये १ हजार ते १२०० डायलिसिस सत्रे पार पाडली जातात असून, २० खाटांची डायलिसिस सुविधा उपलब्ध आहे. राज्यभरात १६ ठिकाणी मोफत डायलिसिस सेवा दिली जात असून, दीनदयाळ स्वास्थ सेवा योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी ७० कोटी रुपयांचा निधी खर्च करत आहे, ज्यामुळे नागरिकांना खासगी इस्पितळांमध्येही चांगल्या सुविधा मिळत आहेत.
मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता योजनेद्वारे रुग्णांना २ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत असून आवश्यक मार्गदर्शनही केले जाते. महिलांच्या आरोग्यासाठी राबवलेल्या 'चेक्ड बाय दोतोर' उपक्रमात ५० हजार महिलांची रक्ततपासणी करण्यात आली, तर 'हेल्थ विथ आयुर्वेद' उपक्रमाचा लाभ १ लाख लोकांनी घेतला आहे. राज्यातील तरुण पिढीच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्याचा विचार करून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधकांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, जे स्वतःला गोव्याचे राखणदार मानतात त्यांनी आधी आपल्या पक्षाची राखण करावी. राज्यात प्रत्येक सीमेवर आणि गावात राखणदार असून, मागील १४ वर्षांत 'डबल इंजिन' सरकारच्या माध्यमातून जात, धर्म किंवा पंथ न पाहता सर्वांगीण विकास साधला गेला आहे. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तळागाळातील घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.


