पणजी : गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला साजरी केली जाणारी पारंपरिक नरकासूर दहन करण्याची प्रथा सध्या तिच्या मूळ संस्कृतीपासून भरकटल्याचा गंभीर आरोप वीजमंत्री तथा मगोप आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. नरकासुराच्या नावाखाली सध्या सुरू असलेला अवाजवी गोंधळ, धांगडधिंगा आणि वाढता राजकीय हस्तक्षेप यामुळे समाजाचे मोठे सांस्कृतिक व सामाजिक नुकसान होत असून, ही विकृती रोखण्यासाठी ही प्रथा आता पूर्णपणे बंद व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.
पूर्वीच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा १९८४ नंतरच्या काळात अत्यंत व्यावसायिक आणि राजकीय स्वरूपात रूपांतरित झाली आहे. निवडणुकीच्या काळात विविध राजकीय नेते आणि पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी या उत्सवाचा गैरवापर करतात, असा दावा त्यांनी केला. या प्रक्रियेत लहान मुलांचा वापर केला जात असून त्यांच्याकडून घरोघरी जाऊन देणग्या मागितल्या जातात, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. नरकासूर प्रतिमेच्या नावाखाली होणारा बीभत्स नाच आणि गोंधळ यांमुळे तरुण पिढीवर विपरीत संस्कार होत आहेत. नरकासुराची प्रतिमा तयार करण्याला आपण कला मानत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी १९८४ पूर्वीच्या या परंपरेच्या मूळ इतिहासाचा शोध घेण्याची गरज अधोरेखित केली.
राजकीय नेते आपापल्या सोयीनुसार निर्णय घेतात, मात्र या सांस्कृतिक घसरणीचा आणि गोंधळाचा फटका स्थानिक समाजाला सहन करावा लागतो. लहान मुलांच्यातील कलागुणांचे कौतुक होणे आवश्यक असले तरी उत्सवातील बीभत्सपणा थांबवण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येऊन ही प्रथा बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.


