पणजी: काही दिवसांपूर्वी सीजेपीच्या मोर्चात देण्यात आलेल्या हिंदुत्व विरोधी घोषणांचा आम्ही निषेध करतो. मात्र हे लोक कोण होते, त्यांनी जाणीवपूर्वक घोषणा दिल्या होत्या का, त्यांना कोणी प्लांट केले होते का, यामागील खरा सूत्रधार कोण याची चौकशी झाली पाहिजे. आंदोलनाची दिशा बदलण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे भाजप सरकारने शोधून काढावे; अशी मागणी काँग्रेसचे (Congress Party) कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर (Sunil Kawthankar) यांनी केली.
गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राहुल म्हांब्रे उपस्थित होते. कवठणकर यांनी सांगितले की, गोव्यातील समाजात सर्वधर्म समभाव मानला जातो. यामुळेच येथील धार्मिक सलोखा चांगला आहे. येथील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. याआधी देखील सरकारविरोधातील विविध आंदोलनांची दिशा बदलण्याचा प्रयत्न झाला आहे.
मत चोरीमुळे आज राज्यात, देशात भाजप विरोधी वातावरण आहे. अशावेळी एसआयआर विरोधी आंदोलनात धर्मविरोधी घोषणा करायला लावून त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वी देशभरात झालेल्या धार्मिक, जातीय दंग्यांचा फायदा भाजपलाच झाल्याचा आरोप कवठणकर यांनी केला.
अधिवेशन संपल्यानंतर ७०० कोटी कर्ज
ते म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात सरकारने यंदा कर्ज काढले नसल्याचे सांगितले. मात्र अधिवेशन संपल्यावर अवघ्या काही दिवसातच ७०० कोटी रुपयांचे कर्ज काढले. आज गोमंतकीयांवर ३८ हजार कोटींचे कर्ज झाले आहे. या कर्जाचे पैसे कशासाठी वापरण्यात आले; याची श्वेतपत्रिका आवश्यक आहे. सरकार विकास कामासाठी खर्च करत नसून केवळ इव्हेंट वर खर्च करत आहे. मागील काही वर्षांत इव्हेंट वर दिवसाला सरासरी ४० लाख रुपये खर्च केले आहेत. कर्ज काढण्याआधी सरकारने विविध खात्यांची हजारो कोटींची थकबाकी वसूल करावी.
एसपीवर कारवाई का झाली नाही?
सुनील कवठणकर म्हणाले की, अबकारी खात्यातील तोतया आयुक्त नियुक्ती प्रकरणी पैसे घेऊन नोकरी देण्यावर कारवाई सुरू झाली आहे. मात्र ती व्यक्ती ज्या पोलीस अधीक्षकांसोबत फिरत होती त्याच्यावर कारवाई कधी होणार त्याचे उत्तर सरकारने द्यावे. पैसे घेऊन नोकरी देण्याच्या घोटाळ्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.


