लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध; संशयिताला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह विविध अटी लागू

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
16th October, 11:09 pm
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध; संशयिताला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

पणजी : पीडित आणि संशयितामधील संबंध परस्पर संमतीने प्रस्थापित झाले होते. पोलिसांनी संशयिताची वैद्यकीय तपासणी आणि इलेक्ट्रॉनिक्स साधने जप्त करण्यासाठी त्याची उपस्थिती आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. या बाबींचा विचार करून मेरशी येथील जलदगती न्यायालयाने तिसवाडी तालुक्यातील २८ वर्षीय जीम व्यावसायिकाला २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी तिसवाडी तालुक्यातील ४१ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, संशयिताने तिला २७ मे २०२६ ते २० जून २०२६ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून शिरदोन, मांद्रे आणि सांताक्रूझ येथील वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. या संबंधांतून ती गर्भवती राहिली, मात्र त्यानंतर संशयिताने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप तक्रारदार महिलेने केला. याची दखल घेऊन निरीक्षक मीरा डिसिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गोवेकर यांनी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंद केला. याच दरम्यान संशयिताने मेरशी येथील जलदगती न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, अॅड. दामोदर धोंड यांनी संशयितांतर्फे युक्तिवाद मांडला. त्यात त्यांनी संशयित आणि तक्रारदार यांच्यातील संबंध परस्पर संमतीने होते. संशयिताची प्रतिमा मलीन करून खंडणी उकळण्याच्या हेतूने ही खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने यापूर्वीही अन्य एका तरुणाविरुद्ध अशाच प्रकारची तक्रार केली होती. सदर प्रकरण परस्पर संमतीचे संबंध असल्याचे स्पष्ट करत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द केल्याचा युक्तिवाद मांडला. तसेच अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासह इतर उच्च न्यायालयातील निवाड्याचे संदर्भ सादर केले. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित जीम व्यावसायिकाला २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. 

हेही वाचा
सर्व पहा