गोव्यात सरकारी खाती, महामंडळात ५४ पदांची भरती

४० पदे कायमस्वरूपी, उर्वरित कंत्राटी पद्धतीने भरणार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
17th October, 11:44 pm
गोव्यात सरकारी खाती, महामंडळात ५४ पदांची भरती

पणजी :  विविध सरकारी खाती, महामंडळात ५४ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ४० पदे कायमस्वरूपी तर उर्वरित कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य खाते, गृह निर्माण मंडळ, पर्यटन विकास महामंडळ, जीएसआयडीसी, सांडपाणी आणि पायभूत विकास महामंडळ यांचा समावेश आहे. एकूण पदांपैकी सर्वाधिक २५ पदे आरोग्य खात्यामधील आहेत. भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जीपीएससीतर्फे ४० पदे भरण्यात येणार आहेत. यातील ३ पदे ट्रान्स्फर ऑन डेप्युटेशन पद्धतीने भरली जातील. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाच्या ८ तर आरोग्य खात्यात २ जागा भरल्या जाणार आहेत. आरोग्य खात्यात ट्यूटरची २५ पदे भरली जातील. यातील १३ पदे विनारक्षित आहेत. यासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. यासाठी उमेदवाराने नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असली पाहिजे. पर्यटन विकास महामंडळात ७ जागांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. यामध्ये ६ चालक आणि एका व्यवस्थापकाचा समावेश आहे.

यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत महामंडळाच्या मुख्य कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती पर्यटन खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जीएसआयडीसीमध्ये टायपिस्टच्या ४ जागांवर भरती होणार आहे. यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे असून २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करावे लागतील. मुलाखतीवेळी शैक्षणिक पात्रतेबाबतची सर्व कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. गृह निर्माण महामंडळात साहाय्यक आणि कनिष्ठ अभियंत्याचे प्रत्येकी एक पद भरण्यात येणार आहे. यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.