वाळपई येथे ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर. सोबत आमदार डॉ. देविया राणे, पी. अभिषेक.
वाळपई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाकार्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित सेवा अभियानांतर्गत वाळपई येथे झालेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. अल्वारा जमिनीचा प्रश्न, जमिनीचे मालकी हक्क, पिण्याचे पाणी, शेती-बागायतीसाठी सिंचन, रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण, पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील पथदीप आणि ‘माझे घर’ योजनेतील प्रलंबित प्रस्ताव हे मुद्दे प्रामुख्याने चर्चेत आले.
वाळपईतील कदंब बसस्थानकाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार डॉ. देविया राणे, सत्तरीचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुर्ट्टीकर, विज्ञान व तंत्रज्ञान महामंडळाचे सचिव पी. अभिषेक आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या पाणी, वीज व रस्त्यांसंबंधीच्या समस्यांवर विलंब न करता कार्यवाही करावी, असे निर्देश ढवळीकर यांनी दिले.
मोर्ले येथील जलप्रकल्पातून चार पंचायतींच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यास मदत होणार असल्याचे आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले. दरम्यान, धरण प्रकल्पाशी संबंधित अडचणी दूर करून बंद असलेल्या उपसा सिंचन योजना सुरू कराव्यात, अशी मागणी पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष गुरुदास ग्रामसेवनी यांनी केली.
कार्यक्रमात अटल आसरा योजना, वनहक्क सनद, ‘माझे घर’ प्रमाणपत्र आणि अन्य योजनांशी संबंधित मंजुरीपत्रांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. नागरिकांच्या समस्यांवर संबंधित खात्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन वेळेत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
पथदीप, शेती आणि पर्यावरणाकडे वेधले लक्ष
पिसुर्ले औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुमारे दोन किलोमीटरच्या अंधाऱ्या भागात पथदीप बसवावेत, अशी मागणी बी. डी. मोटे यांनी केली. बंधाऱ्यांमधील प्लास्टिक कचरा, धोकादायक झाडांची विल्हेवाट, आधुनिक कृषी यंत्रांसाठी अनुदान, धनगर समाजाच्या वनहक्क सनदा आणि ‘माझे घर’ योजनेतील प्रलंबित प्रस्तावांचे प्रश्नही मांडण्यात आले.


