म्हापसा : पणजी येथील कला अकादमीच्या परिसरात जुमा धोबी (३०, रा. मूळ बिहार) याची डोके ठेचून निर्घृणरित्या हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील संशयित आरोपी अजय मंतू तांती कुमार (२२, रा. बेतोडा फोंडा व मूळ बिहार) आणि रितेश गोरख पास्वान कुमार (२६, रा. मूळ बिहार) या दोघांना नाशिक येथे रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. संशयित आरोपी हे सहकारी कामगाराचा खून करून पसार झाले होते.
ही खुनाचा घटना शुक्रवार, १६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. तर सकाळी ६.५७ वाजता उघडकीस आली होती. कला अकादमीच्या आवारात सध्या कंझ्युमर शॉपिंग सेल सुरू आहे. तेथेच रात्रीच्या वेळी ही हिंसक घटना घडली होती. जुमा धोबी हा तेथेच काम करायचा. त्याच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने किंवा तत्सम जड वस्तूने जोरदार वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
पणजी पोलिसांनी या प्रकरणी जगदीशकुमार रांका यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी काम करण्यासाठी कंत्राटदाराने फोंडा येथील मार्केटमध्ये हमाली करणार्या तिघांना आणले होते. त्यातील जुमा धोबी याचा खून करण्यात आला. त्याच्यासोबत असलेले दोघेही कामगार फरार होते. त्यामुळे त्यांनीच ही हत्या केल्याचा प्राथमिक संशय वर्तवण्यात आला होता.
पोलिसांनी जुमाचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून तपासास सुरुवात केली होती. संशयित आरोपी हे रेल्वेमार्गे महाराष्ट्रात नाशिकच्या दिशने गेल्याचे आढळून आले होते. त्यानुसार, पणजी पोलिसांनी महाराष्ट्रातील रेल्वे सुरक्षा दलाला सतर्क केले होते. शनिवारी दुपारी नाशिक येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी थांबताच रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने संशयित आरोपी अजय कुमार आणि रितेश कुमार या दोघांना पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर याबाबतची माहिती पणजी पोलिसांना देण्यात आली असता पोलीस पथक नाशिककडे रवाना झाले आहे. रविवारी हे पथक संशयितांना घेऊन गोव्यात पोहोचणार आहे.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
जुमा याच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संशयितांची पणजी पोलिसांनी चौकशी केल्यानंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर हे अधिक तपास करीत आहेत.


