मडगाव : वेर्णा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या फसवणूक व सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित धर्मेंद्र कुमार प्रसाद (३०) याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. या प्रकरणातील तक्रारीनुसार, मुख्य संशयित अर्जुन राम याने आपण अविवाहित असल्याचे भासवून पीडितेशी संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२४ रोजी बनारस येथील मंदिरात तिच्याशी विवाह केला. पुढे तिला मारहाण व शिवीगाळ करून आपल्या मित्रांकडे सोपविल्याचा, तसेच त्यांच्याकडून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडिता गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
धर्मेंद्र प्रसादच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, मूळ तक्रारीत सुरुवातीला केवळ अर्जुन राम याच्याविरोधात आरोप करण्यात आले होते, असे सांगितले. तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्यात आलेल्या पीडितेच्या जबाबात धर्मेंद्र प्रसाद किंवा रवी यांचा उल्लेख नसल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. अर्जुन राम आणि पीडितेमधील वादातून धर्मेंद्रला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही बचाव पक्षाने केला. धर्मेंद्र वेर्णा येथील एका कंपनीत नोकरीला असून त्याला सहा महिन्यांची मुलगी असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.
पीडितेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविलेल्या जबाबात केवळ अर्जुन रामचा उल्लेख असून धर्मेंद्र प्रसादचे नाव नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. धर्मेंद्रविरोधात सामूहिक बलात्काराच्या आरोपाला प्रथमदर्शनी पुष्टी देणारा पुरावा उपलब्ध नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्याला ३० हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचा एक हमीदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
जामिनाच्या अटीनुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत धर्मेंद्रला दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वेर्णा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावल्यास उपस्थित राहणेही बंधनकारक आहे. याशिवाय, पीडितेशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी अथवा अन्य डिजिटल माध्यमांतून संपर्क साधण्यास आणि तिच्या परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. साक्षीदारांवर दबाव आणणे, पुराव्यांमध्ये छेडछाड करणे यांनाही प्रतिबंध घालण्यात आला आहे. स्वतःचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि सक्रिय दूरध्वनी क्रमांक तपास अधिकारी व न्यायालयाकडे सादर करणे, पासपोर्ट असल्यास तो न्यायालयात जमा करणे, तसेच न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय गोवा किंवा देशाबाहेर न जाण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पीडितेचा जामिनाला हरकत नसल्याचा अर्ज
सरकारी वकिलांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची प्राथमिक अवस्था लक्षात घेऊन जामिनाला विरोध केला. संशयित परप्रांतीय असल्याने तो पळून जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मात्र, पीडितेने स्वतः न्यायालयात अर्ज सादर करून धर्मेंद्रच्या जामिनाला हरकत नसल्याचे स्पष्ट केले.


