जनता दरबारात लोकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
साखळी : गेल्या दोन आठवड्यांपासून जनता दरबार न भरल्याने रविवारी साखळी येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी झाली. गोव्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काही प्रश्नांचे त्यांनी जागीच निराकरण केले, तर अन्य प्रकरणांत संबंधित कर्मचाऱ्यांना पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
दर शनिवारी आणि रविवारी भरणाऱ्या या जनता दरबाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री डॉ. सावंत नागरिकांशी थेट संवाद साधतात. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत जनता दरबार न भरल्याने नागरिकांना मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली नव्हती. रविवारी दरबार पुन्हा सुरू झाल्यानंतर आपल्या समस्या मांडण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या.
जनता दरबारात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आपल्या समस्येवर मार्ग निघतो, असा अनेक नागरिकांचा अनुभव असल्याने ते गोव्याच्या कानाकोपऱ्यातून साखळीत येतात. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधतात. समस्येचे स्वरूप समजून घेतल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातात.
दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाला आपली समस्या मांडण्याची संधी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री रांगेतील शेवटच्या व्यक्तीचीही भेट घेतात. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय दरबार सोडायचा नाही, अशी भूमिका ते घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयांत प्रलंबित असलेली कामे आणि वैयक्तिक अडचणी मांडण्यासाठी नागरिक या दरबाराचा आधार घेत आहेत.जनता दरबारात काही नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी, तर काहींनी पूर्वीच्या तक्रारींचे निराकरण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी उपस्थिती लावली.
समस्यांचे निराकरण हेच समाधान
अंत्योदय तत्त्वाच्या आधारे सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आपल्या कामाचे उद्दिष्ट आहे. समस्या सुटल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. संपूर्ण गोव्यातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


