मडगाव : दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून बनावट गहाणखताच्या आधारे बँकेकडून ७५ लाख रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
युवराज नाईक, उदय नाईक आणि उर्वशी नाईक अशी संशयितांची नावे आहेत. बँक ऑफ बडोदाच्या गांधी मार्केट शाखेचे अधिकारी रितेश वर्मा यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०२३ या कालावधीत गांधी मार्केट येथील तत्कालीन विजया बँकेत हा कथित गैरव्यवहार झाला. विजया बँकेचे नंतर बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले. मुख्य संशयित युवराज नाईक याने बँकेकडून ७५ लाख रुपयांची पतसुविधा मिळवली होती. त्यासाठी नुवे येथील एका भूखंडाची कागदपत्रे बँकेकडे तारण म्हणून सादर करण्यात आली.
या भूखंडाचे कायदेशीर मालक उदय नाईक आणि उर्वशी नाईक असल्याचे भासवून बँकेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर बनावट गहाणखत तयार करून त्याच्या आधारे ७५ लाख रुपयांची पतसुविधा मंजूर करून घेण्यात आली. या माध्यमातून बँकेची आर्थिक फसवणूक करून रक्कम हडप केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष गावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


