दामिनी पालव खूनप्रकरण : अवघ्या सहा तासांत सिंधुदुर्ग पोलिसांकडून मुख्य संशयित साईल धुरी जेरबंद

सिंधुदुर्गातील कडावल-वर्दे येथे हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. तपासचक्रे गतिमान करून पोलिसांनी अवघ्या सहा तासांत मुख्य संशयित साईल धुरीला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
दामिनी पालव खूनप्रकरण : अवघ्या सहा तासांत सिंधुदुर्ग पोलिसांकडून मुख्य संशयित साईल धुरी जेरबंद

सिंधुदुर्ग :  कुडाळ तालुक्यातील कडावल-वर्दे रस्त्यावर शनिवारी एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दामिनी किरण पालव (वय २० वर्षे, रा. खालची पालववाडी, वर्दे) असे मृत तरुणीचे नाव असून, ती हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. या दुर्घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रेमसंबंध आणि त्यातून आलेल्या विसंवादातून हा थरारक खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला.

या घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिसांनी तात्काळ चक्रवेढ रचून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या सहा तासांच्या आत या खुनाचा यशस्वी छडा लावला. मुख्य संशयित साईल धुरी (रा. मठ, ता. वेंगुर्ले) याला रविवारी पहाटे त्याच्या घरातूनच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलीस आता त्याच्याकडून हत्येचे नेमके कारण आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू व दुचाकी जप्त करण्याचे काम करत आहेत.

दामिनी कडावल येथून एसटी बसमधून उतरून वर्दे येथील आपल्या घरी पायी चालत जात होती. साईल धुरी आधीपासूनच दुचाकी घेऊन वाटेत दबा धरून बसला होता. दामिनी जवळ येताच त्याने तिला अडवले आणि त्यांच्यात वाद झाला. संतापाच्या भरात संशयिताने धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह लगतच्या ओढ्यात फेकून दिला. ही भयंकर घटना घडत असताना जवळच शेतात काम करणाऱ्या एका लहान मुलाने दामिनीने स्वतःच्या बचावासाठी केलेला आवाज ऐकला. त्या मुलाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत संशयित दुचाकीवरून वेगाने पसार झाला होता. या मुलाने गावात येऊन कुटुंबीयांना आणि स्थानिकांना प्रकार सांगितल्यानंतर सर्वजण घटनास्थळी धावले आणि पोलिसांना कळवण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जिल्ह्यात तात्काळ नाकाबंदी केली आणि सहा विशेष तपास पथके विविध भागांत रवाना केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह ओरोस व कुडाळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. तांत्रिक विश्लेषण, दामिनीच्या मोबाईलवरील शेवटचे कॉल्स आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या दुचाकीच्या वर्णनावरून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. पहाटे ४च्या सुमारास पोलिसांनी वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथून अवघ्या सहा तासांत संशयिताला ताब्यात घेतले. 

हेही वाचा
सर्व पहा