पेडणे : तोरसे-फकिरपाटा भागात एका बंद घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची धाडसी घरफोडीची घटना रात्रीच्या वेळी समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तोरसे-फकिरपाटा येथील रहिवासी रमेश सदाशिव मावळणकर यांच्या घरातील सर्व सदस्य स्थानिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लांबवला.
कुटुंब नाटकाचा प्रयोग संपवून मध्यरात्री घरी परतले असता, त्यांना घराचा मागील दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आणि कपाटातील दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.


